
सिंधुदुर्ग : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने आज मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. महाराष्ट्राचे महसूल मंत्री . चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मंत्रालयातील दालनात “शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६ साठी फार्मर आयडीची अट शिथिल करण्याबाबत” सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीदरम्यान विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, फार्मर आयडीची अट, कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेताना येणाऱ्या तांत्रिक व प्रशासकीय अडचणी तसेच शेतकऱ्यांच्या हिताशी संबंधित इतर महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना योजनांचा लाभ मिळविताना आवश्यक कागदपत्रे, ऑनलाइन प्रक्रिया आणि फार्मर आयडीसंदर्भातील अडचणींचा सामना करावा लागत असल्याने या अटीमध्ये शिथिलता आणण्याबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. शेतकऱ्यांना योजनांचा लाभ सुलभ पद्धतीने मिळावा आणि कोणताही पात्र शेतकरी प्रशासकीय प्रक्रियेमुळे वंचित राहू नये, यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही विचारविनिमय करण्यात आला.
या महत्त्वपूर्ण बैठकीस मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, ऑनलाइन प्रणालीद्वारे कृषिमंत्री दत्ताजी भरणे, तसेच माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे उपस्थित होते.यावेळी महसूल व कृषी विभागातील वरिष्ठ अधिकारी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संबंधित अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत शेतकऱ्यांच्या समस्या गांभीर्याने मांडून त्या सोडविण्यासाठी आवश्यक प्रशासकीय कार्यवाही आणि पुढील उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ सहज, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने मिळावा, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांना योग्य तो न्याय मिळावा, यासाठी शासनस्तरावर सकारात्मक प्रयत्न सुरू असल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले.










