
देवगड : मत्स्यव्यवसाय विभागाच्या वतीने विशेष कल्याणकारी योजनांचे लाभार्थी शिबिर कै. मोरेश्वर गोगटे सांस्कृतिक भवन, जामसंडे येथे आयोजित करण्यात आले. या शिबिराला गाबीत समाज, देवगडच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी उपस्थित समाजबांधवांना मत्स्यव्यवसाय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. नाव नोंदणी, विमा योजना, कर्ज सुविधा तसेच इतर कल्याणकारी योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिरास सामाजिक कार्यकर्ते बापू जुवाटकर, ज्ञानेश्वर खवळे, व्ही. सी. खडपकर, उल्हास मणचेकर, राजाराम भाबल तसेच अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे कार्याध्यक्ष रतनकुमार झाजम उपस्थित होते.
यावेळी सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी किरण वाघमारे यांच्यासमवेत मच्छीमार गाबीत समाजाच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. गाबीत समाजाच्या वाड्या-वस्त्यांवरही अशाच प्रकारची शिबिरे आयोजित करण्यात यावीत, अशी मागणी रतनकुमार झाजम यांनी केली. या मागणीस किरण वाघमारे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत भविष्यात अशा शिबिरांचे आयोजन करण्याचे आश्वासन दिले.











