
कुडाळ : 'ऑपरेशन सर्च' अंतर्गत कुडाळ पोलिसांनी एका बेपत्ता महिलेचा छडा लावण्यात मोठे यश मिळवले आहे. तालुक्यातील बिबवणे येथील बेपत्ता झालेल्या २६ वर्षीय महिलेचा पोलिसांनी थेट शेजारील कोल्हापूर जिल्ह्यातून शोध घेऊन तिला सुखरूप ताब्यात घेतले आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, बिबवणे नाईकवाडी येथील रहिवासी सौ. संजना संतोष साटम (वय २६) या काही दिवसांपूर्वी अचानक बेपत्ता झाल्या होत्या. याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात महिला बेपत्ता असल्याची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला होता.
महिला बेपत्ता असल्याचा तपास सुरू असतानाच, संजना साटम या कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा येथे असल्याची अत्यंत गोपनीय माहिती कुडाळ पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच कुडाळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ममता जाधव व पोलीस शिपाई संदीप वराडकर यांचे एक विशेष पथक तातडीने कोल्हापूरकडे रवाना झाले. या पथकाने पन्हाळा परिसरातून संजना साटम यांना ताब्यात घेतले आणि त्यांना कुडाळ पोलीस ठाण्यात आणले.
कुडाळ पोलीस ठाण्यात आणल्यानंतर पोलिसांनी संजना साटम यांच्याकडे सखोल चौकशी केली. या चौकशीदरम्यान त्यांनी धक्कादायक खुलासा केला. सासरच्या मंडळींकडून सतत त्रास होत असल्याने, आपण स्वतःच्या मर्जीने सासरचे घर सोडून निघून गेल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.










