LIVE UPDATES

दहावीच्या कॉपीकांडात मुख्याध्यापकासह तिघांवर गुन्हा

२४ जण दोषी, २१ जणांवर संस्थास्तरावर कारवाई
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 19, 2026 21:28 PM
views 77  views

सिंधुदुर्गनगरी : वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा परीक्षा केंद्रावरील दहावीच्या परीक्षेत उघडकीस आलेल्या कॉपी प्रकरणात महत्त्वाची घडामोड घडली असून, मुख्याध्यापक संजय राठोड यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणातील एकूण २४ जणांना कोकण विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दोषी ठरविले असून, उर्वरित २१ जणांवर संबंधित शैक्षणिक संस्थांकडून शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी किंजवडेकर यांनी याबाबतची जबाबदारी वैभववाडीचे गटशिक्षणाधिकारी प्रजापती थोरात यांच्याकडे सोपविली आहे. कोकण विभागीय मंडळाने दिलेल्या आदेशानुसार संबंधितांविरुद्ध तातडीने एफआयआर नोंदविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

चौकशीत धक्कादायक बाबी समोर आल्या असून, आपल्या पाल्याला दहावीच्या परीक्षेत अधिक गुण मिळावेत या हेतूने संबंधित विद्यार्थ्यांचे पालक असलेले मुख्याध्यापक संजय राठोड यांनीच संपूर्ण प्रकार घडवून आणल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात मुख्याध्यापक संजय राठोड, रिलीव्हर पर्यवेक्षक संजयकुमार आडे आणि प्रत्यक्षात उत्तरपत्रिका लिहिणारी अज्ञात व्यक्ती अशा तिघांविरुद्ध वैभववाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

तपासादरम्यान असे उघड झाले की, परीक्षेच्या दिवशी राठोड आणि आडे हे परीक्षार्थीच्या वर्गाबाहेरून अज्ञात व्यक्तीने लिहिलेल्या उत्तरांच्या पुरवण्या वर्गातील पर्यवेक्षकांकडे देत असत. त्या पुरवण्या मुख्य उत्तरपत्रिकेला जोडण्याचे निर्देशही दिले जात होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कोकण विभागीय मंडळ आणि सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाने संयुक्त चौकशी केली होती.

चौकशी अहवालाच्या आधारे मंडळाने २४ जणांना दोषी ठरवत कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार मुख्य सूत्रधार मानल्या गेलेल्या संजय राठोड यांच्यासह तिघांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल होणार असून, इतर २१ जणांवर मंडळाच्या निर्देशानुसार संबंधित संस्थाचालकांकडून आवश्यक ती प्रशासकीय कारवाई केली जाणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी किंजवडेकर यांनी दिली.


या कारवाईमुळे जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, परीक्षा प्रक्रियेतील गैरप्रकारांविरोधात शिक्षण विभागाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.