
कणकवली : कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात रस्त्यावर भाजी विक्री करून अतिक्रमण करणाऱ्या विक्रेत्याविरुद्ध कणकवली नगरपंचायतीने दंडात्मक कारवाई केली आहे. कणकवली शहरात फेरफटका मारत असताना उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांना चौकामध्ये भाजी विक्री करत अतिक्रमण केल्याचे दिसले असता तातडीने नगरपंचायत प्रशासनाला कळवण्यात आले. लगेच नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी दाखल होत या भाजी विक्रेत्याला 500 रुपयांचा दंड केला आहे .यावेळी अतिक्रमण हटाव मोहिमेनंतर नगरपंचायत प्रशासन आता अधिक सक्रिय झाले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार असल्याचे उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी सांगितले आहे
याबाबत बोलताना उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी, "रस्त्यावर भाजी विक्री करून अतिक्रमण करणाऱ्यांवर यापुढेही नियमित कारवाई केली जाईल. शहरातील रस्ते मोकळे ठेवणे आणि नागरिकांना सुरळीत वाहतूक सुविधा उपलब्ध करून देणे ही नगरपंचायतीची जबाबदारी आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल," असे स्पष्ट केले.
दरम्यान, अतिक्रमण हटाव मोहिमेनंतर नगरपंचायत प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून शहरातील विविध भागांमध्ये तपासणी मोहीम सुरू ठेवण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने सांगितले. नागरिकांनी आणि व्यावसायिकांनी सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण न करता नगरपंचायतीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन नाईक यांनी केले आहे. नगरपंचायतीच्या पथकाने संबंधित भाजी विक्रेत्यावर 500 रुपयांचा दंड आकारला असून शहरातील मुख्य रस्ते, चौक आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.










