LIVE UPDATES

विर्डीत धबधब्यात बुडालेल्या युवकाचा मृतदेह ड्रोन कॅमेऱ्यात दिसला

Edited by: कोकणसाद LIVE वृतसेवा
Published on: June 19, 2026 21:37 PM
views 192  views

दोडामार्ग : तालुक्यातील विर्डी येथील वझर सखल धबधब्यात गुरुवारी बुडालेल्या कर्नाटकातील धारवाड येथील विजय दोडमणी (वय २३) या युवकाचा मृतदेह शुक्रवारी शोधमोहिमेदरम्यान ड्रोन कॅमेऱ्यात आढळून आला. मात्र, तो सुमारे सात मीटर खोल पाण्यात असल्याने आणि त्याच ठिकाणी धबधब्याचा प्रचंड प्रवाह कोसळत असल्यामुळे मृतदेह बाहेर काढणे बचाव पथकाला शक्य झाले नाही. परिणामी सायंकाळी शोधमोहीम स्थगित करण्यात आली असून शनिवारी पुन्हा स्कुबाच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत.

गुरुवारी दुपारी विजय दोडमणी हा आपल्या मित्रांसह वझर धबधब्याच्या जलकुंडात पोहत असताना अचानक पाण्यात बुडाला होता. घटनेनंतर दोडामार्ग पोलिस, स्थानिक ग्रामस्थ आणि स्वयंसेवकांनी शोधकार्य सुरू केले होते. मात्र, कुंडाची मोठी खोली आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. शुक्रवारी सकाळी सह्याद्री अॅडव्हेंचर अँड रेस्क्यू टीमचे बाबल आल्मेडा, मायकल डिसोजा, संतान आल्मेडा, दीपक मेस्त्री, नारायण चव्हाण, उत्तम नार्वेकर आणि गुरूनाथ सावंत यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दुर्गम डोंगररांगांमधील धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी पथकाला सुमारे दीड तासांची पायपीट करावी लागली.

घटनास्थळी पोहोचल्यानंतर ड्रोनच्या मदतीने जलकुंडाचे निरीक्षण करण्यात आले. जवळपास तासभर सुरू असलेल्या शोधकार्यानंतर पाण्याखाली मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. ड्रोनद्वारे मिळालेल्या दृश्यांमध्ये मृतदेह सुमारे सात मीटर खोलीवर असल्याचे दिसून आले. मात्र ज्या ठिकाणी तो अडकून पडला होता, त्याच भागावरून धबधब्याचा वेगवान प्रवाह थेट कोसळत असल्याने बचावकार्य अत्यंत धोकादायक बनले. खोल पाणी, प्रचंड दाबाचा प्रवाह आणि सतत बदलणारी परिस्थिती यामुळे पथकाला मृतदेहापर्यंत सुरक्षितरीत्या पोहोचता आले नाही. विविध पर्यायांची चाचपणी करूनही परिस्थितीत सुधारणा न झाल्याने अखेर सायंकाळी शोधमोहीम थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला. आता शनिवारी पुन्हा एकदा मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

विजय दोडमणी याचे कुटुंबीय आणि नातेवाईकही घटनास्थळी उपस्थित होते. मृतदेहाचा शोध लागल्याची माहिती मिळताच त्यांचा अश्रूंचा बांध फुटला आणि परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. उपस्थित ग्रामस्थांनी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

घटनास्थळी रेस्क्यू टीम ड्रोनच्या साह्याने मृतदेह शोधत असताना डोंगर माथ्यावरून एक मोठा दगड रेस्क्यूटीमपासून काही अंतरावर पडला. यावेळी मोठा आवाज झाला. त्यानंतर तो दगड गडगडून खाली येत असल्याचे ग्रामस्थांनी पाहिले आणि सर्वांचीच भीतीने गाळण उडाली. कारण काही दिवसांपूर्वी येथे डोंगराच्या काही भाग कोसळल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. मात्र रेस्क्यू टीम न घाबरता त्यांचे कार्य करत होती व या कार्याचे ग्रामस्थांनी कौतुक केले.