
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी केंद्रप्रमुखांच्या रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेला गती मिळाली असून, नुकत्याच पार पडलेल्या स्पर्धा परीक्षेतून ६९ नव्या केंद्रप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, मंजूर १४४ पदांपैकी अद्यापही ३७ पदे रिक्त असल्याने शैक्षणिक प्रशासनासमोरील मनुष्यबळाचा प्रश्न पूर्णतः सुटलेला नाही.
जिल्ह्यात केंद्रप्रमुखांची मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असल्याने शैक्षणिक कामकाजावर त्याचा परिणाम होत होता. मंजूर १४४ पदांच्या तुलनेत गेली अनेक वर्षे केवळ ३८ केंद्रप्रमुख कार्यरत होते. त्यामुळे रिक्त असलेल्या १०६ पदांसाठी स्पर्धा परीक्षेद्वारे भरती प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रक्रियेतून ६९ उमेदवारांची केंद्रप्रमुखपदी निवड झाली आहे.
नवीन नियुक्त्यांमध्ये देवगड तालुक्यात सर्वाधिक १६ केंद्रप्रमुखांची नियुक्ती झाली असून, सावंतवाडीमध्ये १३, कणकवलीमध्ये १०, वेंगुर्ल्यात ८, वैभववाडीत ८, कुडाळमध्ये ६, मालवणमध्ये ५ आणि दोडामार्गमध्ये ३ केंद्रप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्त्यांनंतर जिल्ह्यातील केंद्रप्रमुखांची एकूण संख्या १०८ वर पोहोचली असली, तरी अद्याप ३७ पदे रिक्त आहेत. यामध्ये मालवण तालुक्यात १०, कुडाळमध्ये १०, दोडामार्गमध्ये ५, वेंगुर्ल्यात ३, सावंतवाडीत ३ आणि देवगडमध्ये २ पदांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, वैभववाडी तालुक्यातील केंद्रप्रमुखांची सर्व मंजूर पदे पूर्णपणे भरली गेली आहेत.
प्राथमिक शिक्षक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उर्वरित रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यातील शैक्षणिक प्रशासन अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.
तालुकानिहाय नव्या नियुक्त्या
देवगड – १६
सावंतवाडी – १३
कणकवली – १०
वेंगुर्ला – ८
वैभववाडी – ८
कुडाळ – ६
मालवण – ५
दोडामार्ग – ३
अद्याप रिक्त पदे
मालवण – १०
कुडाळ – १०
दोडामार्ग – ५
वेंगुर्ला – ३
सावंतवाडी – ३
देवगड – २
वैभववाडी – शून्य (सर्व पदे भरली)










