
सिंधुदुर्गनगरी : फाइन आर्ट सीईटी परीक्षेत महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकावून कसाल गावाचे आणि कसाल हायस्कूलचे नाव उज्ज्वल करणारे माजी विद्यार्थी विलास तवटे यांचा आज कसाल शिक्षण संस्थेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष अवधूत मालणकर यांच्या हस्ते त्यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सत्यवान चव्हाण, खजिनदार सचिन कदम, शाळा समितीचे अध्यक्ष नवीन बांदेकर, मुख्याध्यापक उत्तम मळगावकर, माजी मुख्याध्यापक गुरु कुसगावकर, पर्यवेक्षक बालम मॅडम, सर्व शिक्षकवृंद, पालक वर्ग तसेच इयत्ता पाचवी ते बारावीतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्कार समारंभात उपस्थित मान्यवरांनी विलास तवटे यांच्या यशाचे कौतुक करताना त्यांच्या मेहनत, जिद्द आणि चिकाटीचा विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा, असे आवाहन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर राज्यस्तरावर उल्लेखनीय यश संपादन करता येते, हे विलास यांनी सिद्ध करून दाखविल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. याच कार्यक्रमात शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचेही उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. शाळेच्या वतीने ढोल-ताशांच्या गजरात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. विलास तवटे यांच्या या अभूतपूर्व यशामुळे कसाल हायस्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, विद्यार्थ्यांसाठी ते प्रेरणादायी ठरत आहेत. त्यांच्या पुढील शैक्षणिक आणि कलाक्षेत्रातील वाटचालीसाठी उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या.










