
देवगड : स्थानिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आनंदवाडी येथे आज सकाळी १०:३० ते ११:५० या वेळेत ‘शाळा प्रवेशोत्सव’ व ‘स्वागतोत्सव’ उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक (स. पो. नि.) सुप्रिया बंगडे व महिला पोलीस कॉन्स्टेबल येडगे यांनी शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या आणि जुन्या विद्यार्थ्यांचे पुष्प व गोड खाऊ देऊन अत्यंत आपुलकीने स्वागत केले, तसेच त्यांना पुढील शैक्षणिक प्रवासासाठी मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या.
’पहिले पाऊल’ आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप
नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या चिमुकल्यांचे ‘पहिले पाऊल’ उमटवून त्यांचे विद्यालयात स्वागत करण्यात आले. शासन निर्णयानुसार, उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना शासनातर्फे देण्यात येणारे मोफत गणवेश आणि मोफत पाठ्यपुस्तके मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आली. नवीन पुस्तके आणि गणवेश मिळताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. या नाविन्यपूर्ण आणि उत्साही वातावरणात शाळेतील इयत्ता १ ली ते ४ थी चे ४ विद्यार्थी तसेच अंगणवाडीचे ५ विद्यार्थी आपल्या पालकांसह उपस्थित होते. याप्रसंगी शाळेचे २ शिक्षक, विद्यार्थ्यांचे माता-पालक आणि आनंदवाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपक्रमादरम्यान उपस्थित पालकांना मार्गदर्शन करताना मान्यवरांनी जिल्हा परिषद शाळांचे महत्त्व पटवून दिले. ”जिल्हा परिषद शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उत्तम सुविधा उपलब्ध आहेत. ग्रामीण भागातील पालकांनी आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळेतच प्रवेश देऊन त्यांच्या उज्ज्वल भविष्याचा पाया मजबूत करावा,” असे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच जास्तीत जास्त मुलांचे नाव शाळेत नोंदवण्याबाबत ग्रामस्थांना प्रोत्साहित करण्यात आले.










