
दोडामार्ग : कळणे येथील सिंधुदुर्ग बँकेत पैसे काढण्यासाठी जात असल्याचे सांगून घराबाहेर पडलेली महिला घरी परतली नाही. अमृता अमित कदम (३२, मोरगाव-बौद्धवाडी) असे त्या महिलेचे नाव असून तिचे पती अमित कदम यांनी ती बेपत्ता झाल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात दिली आहे.
बेपत्ता महिलेचे पती अमित कदम यांनी फिर्याद दिली असून फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे, १० जुलै २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास त्यांची पत्नी अमृता कदम ही कळणे येथे बँकेत जाणार असल्याचे सांगून घरातून निघून गेली. त्यावेळी घरातील मुले शाळेत गेली होती, तर अमित कदम हे कामानिमित्त बाहेर गेले होते. संध्याकाळपर्यंत अमृता घरी न परतल्याने कुटुंबियांनी कळणे परिसरासह नातेवाईकांकडे तिचा शोध घेतला. मात्र, ती कुठेही आढळून आली नाही.
विशेष म्हणजे घरातून जाताना तिने एक चिठ्ठी ठेवली असून, “माझा शोध घेऊ नये, मी नातेवाईकांकडे जात आहे,” असा उल्लेख त्यात करण्यात आला आहे. तरीदेखील तिचा कोणताही ठावठिकाणा न लागल्याने कुटुंबीयांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. बेपत्ता महिलेची उंची अंदाजे ५ फूट, गोरा वर्ण, उभट चेहरा, लांब काळे केस, अंगात निळ्या रंगाची फुलांच्या नक्षीची साडी व निळा ब्लाउज, खांद्यावर गुलाबी रंगाची पर्स, गळ्यात मंगळसूत्र तसेच पायात निळ्या रंगाच्या स्लीपर चप्पल होत्या. ही महिला कोठेही आढळून आल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.











