
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाल्याने धरणांमधील पाणीसाठ्यावर त्याचा परिणाम दिसून येत आहे. जुलै महिना संपत आला तरी जिल्ह्यात अनेक भागांत समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील ४५ धरणांपैकी केवळ ९ धरणेच पूर्ण क्षमतेने भरली आहेत. गतवर्षी याच दिवशी १९ धरणे भरली होती. सध्या सर्व धरणांमध्ये मिळून सुमारे ६८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
यंदा मात्र पावसाने ओढ दिल्यामुळे धरणांमध्ये पाणी साचण्याचा वेग कमी झाला आहे. त्यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे.जिल्ह्यातील बहुतांश भागात भात शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. शेतीसाठी पुरेसा पाऊस आवश्यक असल्याने पावसाअभावी शेतकऱ्यांचे लक्ष आता पुढील काही दिवसांकडे लागले आहे. येत्या काळात जोरदार पाऊस झाल्यास धरणांमधील पाणीसाठा वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा सध्या समाधानकारक असला तरी तो पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचलेला नाही. पावसाचा खंड कायम राहिल्यास पुढील काळात पाणीपुरवठा आणि शेतीच्या दृष्टीने अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, हवामानातील बदलामुळे पावसाचे स्वरूपही बदलत असल्याचे चित्र गेल्या काही वर्षांत दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, तसेच पावसाच्या पुढील स्थितीकडे लक्ष ठेवावे, असे आवाहन संबंधित विभागाकडून करण्यात येत आहे. आता जिल्हावासीयांच्या नजरा आगामी पावसाकडे लागल्या असून, जोरदार पावसाने धरणे लवकर भरावीत, अशी सर्वांचीच अपेक्षा आहे.
पूर्ण क्षमतेने भरलेली धरणे
चालू पावसाळी हंगामात कोर्ले सातंडी, आंबोली, मांडखोल, निळेली, सनमटेंब, पुळास, धामापूर, ओझरम, लोरे या प्रकल्पांमध्ये १०० टक्के पाणीसाठा झाला आहे.












