LIVE UPDATES

नाधवडेत २५ जुलैला रंगणार आषाढी एकादशी महोत्सव

'प्रति पंढरपूर'चा दिव्य अनुभव ; अनेक सेलीब्रेटी सोहळ्यात होणार सहभागी
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 23, 2026 19:44 PM
views 21  views

वैभववाडी :  नाधवडे येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात शनिवार, २५ जुलै रोजी भव्य आषाढी एकादशी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या चार वर्षांपासून गावकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून साजरा होत असलेला हा भक्तिमय सोहळा यंदाही विविध धार्मिक कार्यक्रमांनी आणि हरिनामाच्या अखंड गजराने दुमदुमणार आहे. अनेक सेलीब्रेटी या सोहळ्यात सहभागी होणार आहेत.

गावातील ज्येष्ठ आणि युवा मंडळींच्या पुढाकारातून गेली चार वर्षे नाधवडे येथे आषाढी एकादशी महोत्सव साजरा केला जात आहे.याहीवर्षी हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवात 'प्रति पंढरपूर'चा अनुभव भाविकांना मिळणार आहे. दिवसभर धार्मिक विधी, दिंडी सोहळा, भजन, कीर्तन, हरिपाठ आणि महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, परिसरातील वारकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.सकाळी ६ वाजता पूजाअर्चा, दुग्धस्नान, अभिषेक आणि वस्त्रार्पणाने उत्सवाची सुरुवात होईल. त्यानंतर पुजेचे मानकरी यांच्या हस्ते पुजा होईल, नैवेद्य व महाआरतीचा कार्यक्रम पार पडेल. सकाळी १० वाजता गावातील तसेच बाहेरील सर्व दिंड्या चवाटी माता मंदिरात एकत्र येऊन मंदिरापर्यंत हरिनामाच्या गजरात मार्गक्रमण करतील. दुपारी २ वाजता सर्व दिंड्यांचे श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात आगमन होणार असून, दिंडीतील वारकऱ्यांना दर्शन व फराळाचे वाटप करण्यात येणार आहे.

दुपारी ३ ते ६ या वेळेत नामांकित वारकरी भजनांचा कार्यक्रम होईल. सायंकाळी ६ ते ७ या वेळेत ह.भ.प. जगनाथ महाराज येराडकर (सातारा) यांच्या उपस्थितीत हरिपाठ होणार आहे. त्यानंतर ७ ते ८.३० या वेळेत ह.भ.प. येराडकर यांचे सुश्राव्य कीर्तन रंगणार असून, कीर्तनाला ज्ञानेश्वर माऊली सांप्रदायिक भजन मंडळ, खांबाळे यांची साथ लाभणार आहे.रात्री ८.३० ते १०.३० या वेळेत गावातील स्थानिक भजनांचा कार्यक्रम होईल. रात्री १०.३० ते ११ या वेळेत शेजआरतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे. नाधवडे आषाढी एकादशी उत्सव समितीने सर्व भाविकांनी या भक्तिमय सोहळ्यात सहभागी होऊन विठ्ठलनामाचा आनंद घ्यावा, असे आवाहन केले आहे.