
सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री कै. अजित पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त राज्यभर आयोजित विशेष आरोग्य शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्गनगरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील विशेष आरोग्य शिबिराला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील नागरिकांना या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
शिबिराची पाहणी करताना मंत्री राणे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. सिंधुदुर्गातील रुग्णांना दर्जेदार व अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध होत असून भविष्यात उपचारासाठी जिल्ह्याबाहेर रेफर करण्याची वेळ येऊ नये, यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्य शासनाच्या पुढाकारातून जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयासह सर्व आरोग्य संस्थांमध्ये विविध आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली असून आरोग्य जनजागृतीसह मोफत तपासणी व उपचार सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रिक्त पदे लवकरच भरली जातील. आवश्यक मनुष्यबळ व सुविधांची पूर्तता करून जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि बळकट करण्यात येईल, अशी ग्वाहीही मंत्री नितेश राणे यांनी यावेळी दिली. यावेळी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अनंत दवंगे, राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, भाई सावंत, जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया वालावलकर, छोटू पारकर आदी उपस्थित होते.














