LIVE UPDATES

ओणी - अणुस्कुरा मार्गाच्या सुधारणेसाठी ३५० कोटींचा निधी मंजूर

पावसाळ्यानंतर कामाला सुरुवात | आमदार किरण सामंत यांची माहिती
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 29, 2026 06:30 PM
views 46  views

राजापूर : तालुक्याच्या पूर्व भागाला घाटमाथा, कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या महत्त्वपूर्ण ओणी–सौंदळ–रायपाटण–पाचल–कारवली–अणुस्कुरा मार्गाच्या सुधारणेसाठी आशियाई विकास बँकेच्या (एडीबी) योजनेतून तब्बल ३५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून संपूर्ण मार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण, रुंदीकरण आणि मजबुतीकरण करण्यात येणार असून, पावसाळ्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी महत्त्वपूर्ण माहिती आमदार किरण सामंत यांनी गुरुवारी २६ नोव्हेंबरला राजापूर पंचायत समितीच्या आमसभेत दिली. त्यामुळे अनेक वर्षांपासून या मार्गाच्या दुरवस्थेमुळे त्रस्त असलेल्या नागरिक आणि वाहनचालकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

सुमारे ३५ किलोमीटर लांबीचा हा मार्ग राजापूर तालुक्याच्या पूर्व भागातून कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्राकडे जाण्यासाठी महत्त्वाचा दुवा मानला जातो. या मार्गावरून दररोज एसटी बसेससह खासगी प्रवासी वाहने आणि अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. तसेच सौंदळ येथे कोकण रेल्वेचे हॉल्ट स्टेशन असल्याने रेल्वे प्रवाशांसाठीही या मार्गाचे विशेष महत्त्व आहे.

मात्र, गेल्या काही वर्षांपासून या मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत असून, प्रवाशांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खड्डे बुजविण्यासाठी वारंवार तात्पुरती डागडुजी केली जाते; मात्र अवजड वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे काही दिवसांतच रस्त्याची पुन्हा दुरवस्था होत आहे. त्यातच आंबा घाटातील वाहतुकीच्या समस्यांमुळे अणुस्कुरा घाटमार्गावरील वाहतुकीचा ताण वाढत असून, या मार्गाच्या दर्जेदार सुधारणेची मागणी सातत्याने होत होती.

गुरुवारी झालेल्या पंचायत समितीच्या आमसभेतही या रस्त्याच्या दुरवस्थेचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावेळी उत्तर देताना आमदार किरण सामंत यांनी या मार्गाच्या कायमस्वरूपी सुधारणेसाठी एडीबी योजनेतून ३५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे स्पष्ट केले. या निधीतून रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण, रुंदीकरण आणि मजबुतीकरण करण्यात येणार असल्याने भविष्यात या मार्गाची वाहतूक क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. तसेच प्रवास अधिक सुरक्षित आणि वेगवान होण्याबरोबरच वारंवार खड्ड्यांमुळे होणारी गैरसोयही दूर होण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, मुख्य कामाला पावसाळ्यानंतर सुरुवात होणार असली, तरी तोपर्यंत वाहनचालक आणि प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविण्याच्या सूचना व उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही आमदार सामंत यांनी सांगितले.

पश्चिम महाराष्ट्राशी दळणवळण अधिक सुलभ होणार

ओणी–अणुस्कुरा मार्ग हा केवळ राजापूर तालुक्याच्या पूर्व भागातील गावांना जोडणारा रस्ता नसून, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्यातील दळणवळणाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा मार्ग आहे. त्यामुळे ३५० कोटी रुपयांच्या निधीतून होणाऱ्या या कामामुळे परिसरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होण्यासोबतच व्यापार, पर्यटन आणि स्थानिक विकासालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे. आता या महत्त्वाकांक्षी कामाला पावसाळ्यानंतर प्रत्यक्ष सुरुवात होऊन ते दर्जेदार आणि निर्धारित वेळेत पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.