LIVE UPDATES

सायबर सेक्युरिटी आणि ऑनलाईन गेमिंगबाबत जिल्ह्यात भक्कम यंत्रणा उभारणार : नितेश राणे

Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: September 21, 2026 14:51 PM
views 28  views

सिंधुदुर्गनगरी : जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली सायबर सेक्युरिटी आणि ऑनलाईन गेमिंगच्या वाढत्या प्रभावाबाबत महत्त्वपूर्ण बैठक झाली. जिल्ह्यातील सायबर गुन्हे तसेच ऑनलाईन गेमिंगच्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी प्रभावी आणि भक्कम यंत्रणा उभारण्याबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

सिंधुदुर्ग जिल्हा गोवा राज्याच्या सीमेलगत असल्याने तसेच जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता सायबर गुन्हे आणि ऑनलाईन गेमिंगशी संबंधित गैरप्रकारांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे. काही आठवड्यांपूर्वी जिल्ह्यात ऑनलाईन गेमिंगच्या आहारी गेलेल्या एका तरुणाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यांनी चिंता व्यक्त केली.

पोलिसांकडून करण्यात आलेल्या प्रभावी कारवाईमुळे मटका आणि जुगाराची अनेक पारंपरिक केंद्रे बंद झाली आहेत. मात्र, अशा गैरप्रकारांचे स्वरूप आता ऑनलाईन माध्यमांकडे वळत असल्याचे निदर्शनास येत आहे. विशेषतः तरुण वर्ग ऑनलाईन मटका, गेमिंग आणि तत्सम डिजिटल प्लॅटफॉर्मच्या संपर्कात येत असल्याने त्यावर प्रभावी नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

ऑनलाईन गेमिंगच्या अतिवापरामुळे तरुणांमध्ये आर्थिक नुकसान, मानसिक ताण आणि नैराश्यासारख्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असून, काही प्रकरणांमध्ये त्याचे गंभीर परिणामही समोर येत आहेत. त्यामुळे या प्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर आणि अपर पोलीस अधीक्षक यांच्या समन्वयाने जिल्ह्यात स्वतंत्र आणि सक्षम यंत्रणा उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

सायबर गुन्ह्यांचे प्रतिबंध, शोध आणि तपास अधिक प्रभावी करण्यासाठी पोलिसांकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याची विशेष परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून जिल्ह्याला विशेष टीम अथवा अतिरिक्त मनुष्यबळ आणि तांत्रिक क्षमता उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

जिल्ह्यातील तरुण पिढी सायबर गुन्हेगारीच्या जाळ्यात किंवा ऑनलाइन जुगार व गेमिंगच्या चुकीच्या सवयींच्या आहारी जाऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांसोबतच जनजागृतीवरही भर देण्यात येणार आहे. सायबर गुन्ह्यांचे डिटेक्शन वाढवून दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. या संपूर्ण विषयाबाबत प्रशासनाकडून सविस्तर माहिती घेण्यात आली असून, आगामी काळात या उपाययोजनांचे सकारात्मक परिणाम दिसून येतील, असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.