LIVE UPDATES

तुळस येथील वीजपुरवठा सुरळीत करा

जि . प सदस्य सुजाता पडवळ यांची मागणी
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 18, 2026 17:51 PM
views 80  views

तुळस : तुळस परिसरातील धोकादायक विद्युत वाहिन्या, वीजवाहिन्यांलगत वाढलेली झाडे आणि वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याबाबत तुळस जिल्हा परिषद सदस्या सौ. सुजाता पडवळ यांनी महावितरणचे लक्ष वेधले आहे.श्री गिरोबा विद्यालयाच्या आवारातून व मुख्य प्रवेशद्वारावरून जाणाऱ्या ११ के.व्ही. उच्चदाब आणि एल.टी. विद्युत वाहिन्यांमध्ये वारंवार स्पार्किंग होत असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. या वाहिन्या तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

तसेच तुळस घाटीतील धोकादायक झाडे तोडून वीजपुरवठा सुरळीत करावा. वारंवार वीज खंडित होत असल्याने तुळस प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसींच्या सुरक्षित साठवणुकीवरही परिणाम होण्याची भीती आहे. अनुचित घटना घडण्यापूर्वी महावितरणने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी पडवळ यांनी केली.यावेळी शेखर आरोलकर, शिवाजी तांडेल, राहुल सावंत, बाळा शिरोडकर, गंगाराम शेळके उपस्थित होते.