LIVE UPDATES

पावसाळ्यात ‘सर्पसंकट’ वाढले !

सिंधुदुर्गात पाच वर्षांत ४,२९१ सर्पदंश , चौघांचा मृत्यू ; ‘मांत्रिक नव्हे, तातडीचे उपचारच जीव वाचवतात’
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 18, 2026 17:06 PM
views 92  views

सिंधुदुर्गनगरी | लवू म्हाडेश्वर

पावसाळ्याच्या दिवसांत सापांचा वावर वाढल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्पदंशाच्या घटनांमध्येही चिंताजनक वाढ होत असल्याचे चित्र समोर आले आहे. गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यात तब्बल ४ हजार २९१ नागरिकांना सर्पदंश झाला असून चार जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने नागरिकांना अंधश्रद्धा आणि मांत्रिकांच्या उपचारांपासून दूर राहून सर्पदंश झाल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता शासकीय रुग्णालयात उपचार घ्यावेत, असे ठाम आवाहन केले आहे.

पावसाळ्यात शेतकाम, जंगल परिसरातील वावर तसेच पाणथळ भागांमध्ये साप मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना सर्पदंशाचा धोका अधिक असतो. अशा वेळी घाबरून न जाता रुग्णाला शांत ठेवणे, दंश झालेला अवयव शक्य तितका स्थिर ठेवणे आणि तातडीने रुग्णालयात नेणे, हेच जीव वाचविण्यासाठी सर्वात महत्त्वाचे असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांमध्ये ५ हजार १७२ अँटी-स्नेक व्हेनम (एएसव्ही) इंजेक्शन, तर प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये १ हजार ७७० इंजेक्शनचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे सर्पदंशावरील उपचारासाठी आवश्यक औषधांची कोणतीही कमतरता नसल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

आरोग्य अधिकाऱ्यांनी नागरिकांना अफवा, झाडफूक, मांत्रिक किंवा घरगुती उपायांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. योग्य वेळी वैज्ञानिक पद्धतीने उपचार मिळाल्यास बहुतांश सर्पदंशग्रस्तांचे प्राण वाचू शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

काय कराल, काय टाळाल?

सर्पदंश झालेल्या व्यक्तीला शक्य तितके शांत ठेवा.

दंश झालेला अवयव हलविणे टाळा.

जखमेवर चिरा मारू नका किंवा विष शोषण्याचा प्रयत्न करू नका.

मांत्रिक, झाडफूक किंवा घरगुती उपायांवर वेळ दवडू नका.

तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन उपचार घ्या.

पाच वर्षांतील सर्पदंशाचा आढावा

२०२२-२३ : ९५६ रुग्ण

२०२३-२४ : १,०४८ रुग्ण

२०२४-२५ : १,०६८ रुग्ण; १ मृत्यू

२०२५-२६ : ९६७ रुग्ण; ३ मृत्यू

२०२६-२७ (आतापर्यंत) : २५२ रुग्ण

एकूण (५ वर्षे) : ४,२९१ सर्पदंशग्रस्त • ४ मृत्यू