LIVE UPDATES

आधुनिकीकरणाच्या चक्रव्यूहात जपला संस्कृतीचा अमूल्य वारसा

नेरूरपारच्या नाईक कुटुंबाची निसर्गपूरक गणेशभक्ती
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 18, 2026 17:02 PM
views 47  views

कुडाळ : गणेशोत्सवाचा सण जवळ आला की घराघरात दिसणारे चकचकीत फ्लेक्स बॅनर, चायनीज प्लास्टिकची कृत्रिम फुले आणि आधुनिकीकरणाचा अतीव झगमगाट... आज उत्सवाचे स्वरूप पार बदलून गेले आहे. परंतु, या चकाचौंधीतही कोकणातील लाल मातीचा सुगंध, निसर्गाची आत्मीयता आणि पूर्वजांची समृद्ध परंपरा आजही जपणारे एक कुटुंब सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील नेरूरपार येथे पाहायला मिळते. गावातील नाईक कुटुंबीयांनी कोणत्याही  'इको-फ्रेंडली' गणेशसजावट सध्या संपूर्ण कोकणात कौतुकाचा विषय ठरली आहे.

निसर्गाच्या कुशीत वसलेले अस्सल कोकणी घर

नाईक कुटुंबीयांच्या घरात पाऊल ठेवताच जुन्या काळातील समृद्ध, शांत आणि प्रसन्न कोकण जिवंत झाल्याचा भास होतो. सिमेंटच्या भिंती आणि रासायनिक रंगांना पूर्णपणे फाटा देत, या घराच्या मातीच्या भिंती शेणाने नीट सारवून काढण्यात आल्या आहेत.

सजावटीत प्लास्टिकच्या दिव्यांऐवजी बांबू, सुपारीची झाडे, वाळलेले गवत आणि कापूस या निसर्गदत्त साधनांचा अत्यंत कलात्मक वापर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ज्या बाप्पाच्या आगमनाने घर प्रसन्न झाले आहे, ती विघ्नहर्त्याची मूर्तीही पूर्णपणे मातीपासूनच साकारलेली आहे.

या देखाव्याचे मुख्य आकर्षण म्हणजे भिंतींवर रेखलेली महाराष्ट्राची प्राचीन लोककला—'वारली पेंटिंग'. नाईक कुटुंबातील तरुण मुलांनी आपल्या कुंचल्याच्या फटक्यांतून नेरूर गावाचे ग्रामदैवत श्री कलेश्वर मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे. यात केवळ मंदिराचे रूपच नाही, तर गावातील ऐतिहासिक परंपरा, देवाची निघणारी दिमाखदार पालखी, भव्य रथोत्सव आणि निसर्गरम्य तळे या सर्व गोष्टी वारली शैलीत जिवंतपणे मांडल्या आहेत.

केवळ देखावा उभारून हे कुटुंब थांबलेले नाही, तर आजच्या डिजिटल पिढीला आपल्या पूर्वजांच्या जीवनशैलीची ओळख व्हावी म्हणून त्यांनी घरात जुन्या काळातील दुर्मिळ वस्तूंचे प्रदर्शन मांडले आहे. एकेकाळी घराघरांत वापरले जाणारे पाटा-वरवंटा, जाते, सुपली, टोपली आणि काळाच्या पडद्याआड गेलेली जुनी पारंपरिक मापे—म्हणजेच कुडो, शेर आणि पायली—येथे अत्यंत आदराने सजवून ठेवण्यात आली आहेत.

आजची तरुण पिढी डिजिटल तंत्रज्ञानात व्यस्त असताना, नाईक कुटुंबातील तरुणांनी मात्र आपल्या सांस्कृतिक मुळांशी जोडलेले राहण्याचा हा अनोखा मार्ग निवडला आहे. "आम्ही तंत्रज्ञानाने अपडेट नक्कीच होत आहोत, पण आपली मूळ संस्कृती, कला आणि निसर्गाचे रक्षण विसरून चालणार नाही," हाच विचार या तरुणांनी आपल्या कृतीतून मांडला आहे. प्लास्टिकमुक्त आणि पर्यावरणस्नेही गणेशोत्सव कसा साजरा करावा, याचा एक प्रेरणादायी आदर्शच नेरूरपारच्या नाईक कुटुंबाने समाजासमोर ठेवला आहे.