
रत्नागिरी : राज्य शासनाच्या ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील शिरगांव, नाचणे, खानावली, हर्चे आणि साखरपा या ग्रामपंचायतींमध्ये कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. राज्यस्तरावरून नॉलेज लिंक व ऍक्शन फॉर बेटर टुमोरो सोसायटी चे राजू गुट्टे व स्टेट पी.एम.यू.श्रीमती प्रीती साबळे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन केले.
अभियानांतर्गत केवळ माहिती व मार्गदर्शन न करता लोकसहभाग आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांवर विशेष भर देण्यात आला. ग्रामस्थ, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य , अधिकारी-कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, शिक्षक तसेच विविध समित्यांच्या सदस्यांचा सहभाग घेऊन गावातील आरोग्य, स्वच्छता, सुरक्षित पाणी, पोषण, पर्यावरण व सार्वजनिक आरोग्याशी संबंधित बाबींचा प्रत्यक्ष आढावा घेण्यात आला.
गावातील समस्या ओळखून स्थानिक पातळीवर उपाययोजनांवर भर
‘माझं गाव, आरोग्यसंपन्न कसं होईल?’ यासाठी ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे राज्यस्तरीय पथकाने स्पष्ट केले. गावातील उपलब्ध साधनसंपत्तीचा योग्य वापर, स्थानिक पातळीवरील समस्या ओळखणे आणि ग्रामस्थांच्या सहभागातून त्यावर उपाययोजना करणे, यासाठी ठोस कृती आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
पाहणीदरम्यान उपस्थित नागरिक व कर्मचाऱ्यांच्या सहभागातून गावाचा नकाशा तयार करून आरोग्य व स्वच्छतेशी संबंधित आवश्यक बाबींची नोंद करण्यात आली. तसेच ग्रामपंचायत स्तरावर राबविता येणाऱ्या विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले. गावातील सार्वजनिक समस्या कोणत्या आहेत, त्यामागील कारणे काय आहेत आणि त्यावर स्थानिक पातळीवर कोणत्या उपाययोजना करता येतील, यावर विशेष चर्चा करून ग्रामस्थांचे व्यक्तिगत अभिप्राय व सूचना घेण्यात आल्या.
अभियानातील प्रत्येक उपक्रमात ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग राहावा आणि ‘हे आपले अभियान आहे’ या भावनेतून गावाच्या आरोग्यविषयक विकासात प्रत्येकाने योगदान द्यावे, यावर यावेळी भर देण्यात आला.
समन्वयातून आरोग्यसंपन्न गावाची संकल्पना
लोकसहभागातूनच आरोग्यसंपन्न गावाची संकल्पना प्रत्यक्षात साकार होऊ शकते, असे राज्यस्तरीय मार्गदर्शकांनी सांगितले. ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, इतर संबंधित विभाग आणि ग्रामस्थ यांनी समन्वयाने काम केल्यास गावाच्या आरोग्यविषयक परिस्थितीत सकारात्मक बदल घडवून आणता येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ हे केवळ शासकीय अभियान न राहता ग्रामस्थांच्या सहभागातून लोकचळवळ बनावे, यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.
— डॉ. अनिरुद्ध आठल्ये
जिल्हा आरोग्य अधिकारी
जिल्हा परिषद, रत्नागिरी













