
देवगड : देवगड येथील शेठ म. ग. हायस्कूलमध्ये पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या ९५ व्या पुण्यतिथीनिमित्त शाळेच्या संगीत विभागातर्फे ‘स्वरांजली’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पंडित पलुसकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाला शाळा समिती अध्यक्ष चंद्रकांत शिंगाडे, मुख्याध्यापक प्रविण खडपकर, प्रमोद नलावडे, प्रसाद शेवडे, राजेंद्र हिंदळेकर आदी मान्यवर उपस्थित होते. या स्वरांजली कार्यक्रमात शाळेच्या विद्यार्थ्यांनी शास्त्रीय संगीताची सुरेल मेजवानी सादर केली.
सानवी समीर मर्गज, पृथा सुशील कुमार लोके आणि वेद राहुल गोगटे यांनी हार्मोनियम वादन केले. प्रांजली महेश कानेटकर, वेद योगेश बोभाटे आणि राधा हेमंत जोशी यांनी शास्त्रीय गायन सादर केले. अभिनव उदय जोशी यांनी तबलावादन केले. त्यानंतर संगीत विषय शिक्षक प्रसाद शेवडे यांनीही शास्त्रीय गायन सादर केले. या सादरीकरणांना अभिनव जोशी, तबला विषय शिक्षक उमेश कोयंडे तसेच सौरभ कानेटकर यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे निवेदन व पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या जीवनकार्याचा आढावा सहाय्यक शिक्षक सागर कर्णिक यांनी घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी उमेश कोयंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.










