
कणकवली : कणकवली येथील मुक्तांगण प्रीस्कूलला ESFE (Education & School Excellence Forum) आणि द टाइम्स ऑफ इंडिया यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित ‘Star Education Awards 2026’ अंतर्गत ‘Best Infrastructure in Pre-School – Sindhudurg’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. मुंबईतील NESCO परिसरात ६ ऑक्टोबर रोजी झालेल्या पुरस्कार सोहळ्यात संस्थेच्या संचालिका प्रणाली अभिजित सावंत यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
मुक्तांगण प्रीस्कूलच्या संस्थापक सुलेखा रमेश राणे यांच्या मार्गदर्शनातून आणि दूरदृष्टीतून उभ्या राहिलेल्या या संस्थेने कणकवली परिसरातील बालशिक्षण क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
मुलांच्या सर्वांगीण विकासाला केंद्रस्थानी ठेवून मुक्तांगणमध्ये सुरक्षित, आनंददायी आणि बालस्नेही वातावरण निर्माण करण्यात आले आहे. प्रशस्त परिसर, खेळाचे मैदान, CCTV सुरक्षा व्यवस्था, स्वतंत्र वर्गखोल्या, वयाला अनुरूप ग्रंथालयातील पुस्तके, तसेच विविध शैक्षणिक उपक्रम ही मुक्तांगणची वैशिष्ट्ये आहेत.
मुलांमध्ये आत्मविश्वास, संवादकौशल्य, सर्जनशीलता आणि सामाजिक विकास घडविण्यासाठी Phonics, Public Speaking, योग आणि अनुभवाधारित शिक्षणावर विशेष भर दिला जातो.
हा पुरस्कार संस्थापक सुलेखा राणे, समर्पित शिक्षकवृंद, ग्राउंड स्टाफ, पालक आणि मुक्तांगणच्या सर्व विद्यार्थ्यांना समर्पित करत असल्याचे प्रणाली सावंत यांनी सांगितले. या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे खजिनदार रमेश राणे तसेच संस्थेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी प्रणाली सावंत, शिक्षकवृंद आणि मुक्तांगणच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
“हा सन्मान केवळ एका पुरस्काराचा आनंद नाही, तर मुक्तांगणवर पालकांनी ठेवलेल्या विश्वासाची आणि आमच्या संपूर्ण टीमच्या अथक प्रयत्नांची पावती आहे.” असे प्रणाली सावंत यांनी सांगितले.
कणकवलीसारख्या ग्रामीण भागात दर्जेदार, सुरक्षित आणि आधुनिक पूर्वप्राथमिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याच्या मुक्तांगणच्या प्रयत्नांना या पुरस्कारामुळे आणखी बळ मिळाले आहे.










