LIVE UPDATES

फरार भारत लाखे स्वतः पोलीस ठाण्यात हजर

सावंतवाडी नगरपरिषद पाणी पुरवठा अपहार प्रकरण
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 07, 2026 19:13 PM
views 75  views
#kokansadlive#news update#konkan update#

सावंतवाडी : नगरपरिषद पाणीपुरवठा विभागातील रजिस्टर गहाळ झाल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा असलेले पालिकेचे जोडारी भारत लाखे हे आज स्वतःहून सावंतवाडी पोलीस ठाण्यात हजर झालेत. पोलिसांकडून त्यांना ताब्यात घेत अटक केली आहे. गेले २० ते २५ दिवस फरार होते‌. 

सावंतवाडी नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागात १७ लाखांचा अपहार झाल्याचा आरोप झाल्यानंतर झालेल्या चौकशीत या विभागाची नोंदवही जोडारी भारत लाखे हा नेत असतानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते. याप्रकरणी पालिका प्रशासनाकडून लाखे यांच्या विरोधात नोंदवही गहाळ केल्याप्रकरणी पोलीसांत तक्रार देण्यात आली होती. त्यानुसार १२ सप्टेंबर रोजी लाखे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

गुन्हा दाखल झाल्यापासून आजपर्यंत लाखे पोलिसांना गुंगारा देऊन गायब होता. पोलिसांकडून त्याला ताब्यात घेण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू होते‌. त्यांच्या घरच्यांकडेही पोलिसांनी याबाबत चौकशी केली. मात्र, लाखे पोलिसांना सापडून येत नव्हता. याच दरम्यान दोन दिवसांपूर्वी त्याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. त्यात त्याने पाणी पुरवठा सभापतींवर आरोप करत कुटुंबासह आत्महत्येचा इशारा दिला होता. 

यातच आज सकाळी तो स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत अटक केली आहे‌. त्याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये आपण नोंदवही गहाळ केलेली नाही असं त्यांनी सांगितल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. आपण घरातच वरच्या रूममध्ये राहत होतो असे सांगितल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान, त्याला उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक यांनी सांगितले.