LIVE UPDATES

दुष्काळ , पाणीटंचाईचा सामना करण्यास कुडाळ नगरपंचायत सज्ज

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 07, 2026 19:48 PM
views 31  views
#kokansadlive#news update#konkan update#

कुडाळ: चालू वर्षातील हवामानातील बदल आणि संभाव्य दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, कुडाळ तालुक्याचा 'दुष्काळ कळ १' मध्ये समावेश झाला आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत कुडाळ शहरात आगामी काळात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होऊ नये यासाठी कुडाळ नगरपंचायत प्रशासनाने ठोस आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना आखल्या आहेत. यासंदर्भात आज, बुधवारी (दि. ७ ऑक्टोबर) नगरपंचायतीत विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.

पावशी धरण आणि भंगसाळ नदीमधील उपलब्ध पाणीसाठा अत्यंत जपून वापरणे आवश्यक असल्याने, सध्याच्या नियमित कालावधीपेक्षा अर्धा तास पाणी कपात करण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला आहे.

शहरात विविध ठिकाणी बांधणार बंधारे

कुडाळ नगरपंचायत क्षेत्रात पाणीसाठा वाढवण्यासाठी शहरातील कुंभारवाडी, काविलकाटे, नाबरवाडी आणि तुपटवाडी येथे बंधारे बांधण्यासाठी योग्य जागांची पाहणी केली जाणार आहे. या उपक्रमात विविध अशासकीय संस्था, स्थानिक नागरिक, उद्योजक, पत्रकार संघ, व्यापारी संघ, लायन्स क्लब आणि रोटरी क्लब यांचा सक्रिय सहभाग घेतला जाणार आहे.

शहरातील नगरपंचायतीच्या मालकीच्या जागांमध्ये 'जलतारा प्रकल्प' राबवला जाणार आहे. तसेच, नगरपंचायतीच्या मालकीच्या बारमाही विहिरींमधील गाळ उपसून आवश्यकतेनुसार त्याद्वारे शहराला पाणीपुरवठा केला जाईल. ऐन उन्हाळ्यात (मार्च, एप्रिल आणि मे दरम्यान) गरज भासल्यास नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी आतापासूनच नियोजन केले जात आहे. शहरातील जलवाहिन्यांची गळती रोखण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले असून दुरुस्तीची कामे वेगाने सुरू आहेत. नागरिकांना कुठेही गळती आढळल्यास नगरपंचायतीच्या १८००२३३१४३६ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अनधिकृत नळ कनेक्शन आढळल्यास ते तत्काळ खंडित केले जातील. याशिवाय शहरात वृक्षारोपण आणि 'पाणी अडवा, पाणी जिरवा' या धर्तीवर जलसंवर्धनासाठी व्यापक जनजागृती केली जाणार आहे.

नगरपंचायत प्रशासनाने सर्व कुडाळवासीयांना पिण्याच्या पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करण्याचे आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.