LIVE UPDATES

गोव्यात हत्या करून मृतदेह फेकला निरवडेत

त्या युवकासोबत घातपात ; पोलीस तपासात समोर
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 07, 2026 19:36 PM
views 90  views
#kokansadlive#news update#konkan update#

सावंतवाडी : सावंतवाडी रोड रेल्वेस्थानकानजीक निरवडे नमसवाडी येथे आढळून आलेल्या २३ वर्षीय आजीम खान ( रा. उत्तर प्रदेश ) या युवकाचा घातपात झाल्याचे समोर आले आहे. काल सायंकाळी त्याचा मृतदेह रस्त्याच्या कडेला पोलिसांना आढळून आला होता. गोव्यात हत्या करून त्याचा मृतदेह या ठिकाणी टाकण्यात आल्याचे पोलीस तपासात पुढे आला आहे. 

निरवडे नमसवाडी येथे मंगळवारी सायंकाळी रस्त्यालगत या युवकाचा मृतदेह निदर्शनास आला होता. याबाबत पोलिसांना कल्पना मिळताच पोलिसांनी पंचनाम्याअंती मृतदेह ताब्यात घेतला होता. दरम्यान, त्याच्याकडे आढळून आलेल्या ओळखपत्राच्या आधारे व मोबाईलवरून चौकशी केली असता सदरचा युवक हा गोव्यात शोरमा सेंटरमध्ये काम करत असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्या दिशेने तपास केला असता मयत युवक आणि संबंधित मालकाचा मेहुणा स्वतंत्र शोरमा सेंटरचा व्यवसाय सुरू करण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, हा त्यांचा निर्णय मूळ मालकाला रूचला नाही. 

यातून त्याने मयत युवकाला बोलावून घेत विचारणा केली. यावेळी दोघात शाब्दिक बाचाबाची होऊन त्याचे रूपांतर मारहाणीत झाले. यात मयत युवकाला गंभीर दुखापत झाल्याने तो गतप्राण झाला. त्यानंतर भयभीत झालेल्या संबंधित शोरमा सेंटरच्या मालकाने त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने चारचाकी गाडीतून मृतदेह आणत निरवडे नमसवाडी येथे फेकला. मात्र, त्याच्या खिशातील ओळखपत्राद्वारे घडलेलं हे प्रकरण उघडकीस आले. 

या गुन्ह्याचा तपासासाठी सावंतवाडी पोलीस गोव्यात तळ ठोकून आहेत. हा गुन्हा ओल्ड गोवा या भागातील असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तो तपासासाठी गोवा पोलिसांकडे वर्ग केला जाण्याची शक्यता आहे. याबाबत अधिकृत माहितीसाठी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.