
देवगड : ऐन दिवाळीच्या सणातच दाभोळे गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शेतात काम करत असताना विषारी घोणस सर्पाने दंश केल्याने दाभोळे येथील मोहन गोविंद घाडी (वय ५५) यांचा मृत्यू झाला. उपचारासाठी देवगड, ओरोस आणि त्यानंतर गोवा येथे हलविण्यात आले; मात्र त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण दाभोळे गावावर शोककळा पसरली असून, जिल्ह्यातील आरोग्य सुविधांच्या उपलब्धतेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत.
देवगड तालुक्यातील दाभोळे येथील मोहन घाडी हे युवा शेतकरी तसेच गवंडी कामगार म्हणून परिचित होते. शुक्रवारी नेहमीप्रमाणे ते पत्नीसमवेत शेतात काम करण्यासाठी गेले होते. यावेळी शेतात काम करत असताना विषारी घोणस जातीच्या सर्पाने त्यांच्या पायाला जोरदार दंश केला. सर्पदंशानंतरही ते पत्नीसमवेत सुमारे अर्धा तास चालत घरी पोहोचले. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी देवगड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.
मात्र, तेथील आरोग्य यंत्रणेकडून पुढील उपचारांसाठी त्यांना ओरोस जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. ओरोस येथे उपचार सुरू असताना शनिवारी रात्री उशिरा त्यांना अधिक उपचारांसाठी गोवा येथील रानबांबुळी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. ऐन दिवाळीच्या सणात घडलेल्या या घटनेने घाडी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगी, भाऊ असा परिवार आहे.
दरम्यान, या घटनेनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेतील सोयीसुविधा आणि आपत्कालीन उपचारांच्या उपलब्धतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सर्पदंशासारख्या गंभीर प्रसंगी आवश्यक उपचार वेळेत उपलब्ध होणे किती महत्त्वाचे आहे, हे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे. जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये सर्पदंशावरील आवश्यक औषधोपचार, प्रतिविष (अँटीव्हेनम) आणि अतिदक्षता उपचारांच्या सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असाव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
वेळेत प्रभावी उपचार आणि आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध झाल्या असत्या तर कदाचित मोहन घाडी यांचे प्राण वाचले असते, अशी भावना ग्रामस्थ आणि नागरिक व्यक्त करत आहेत. ऐन दिवाळीत एका कुटुंबाचा आधार हरपल्याने दाभोळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.








