
सिंधुदुर्गनगरी : प्रत्येक व्यक्तीमध्ये सुप्त गुण असतात आणि ते समाजासमोर आणण्यासाठी सकारात्मक कार्य करणे गरजेचे आहे. समाजासाठी योगदान देणाऱ्यांचा गौरव करणे ही काळाची गरज आहे. पुरस्कारामुळे व्यक्तीला अधिक जोमाने कार्य करण्याची ऊर्जा मिळते. यश आणि प्रतिष्ठेमागे खडतर परिश्रम असतात, त्यामुळे हा सन्मान म्हणजे समाजाच्या प्रगतीचा प्रेरणादायी उत्सव आहे असे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ (मुंबई), कोकण बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि यशश्री फाउंडेशन (सिंधुदुर्ग) यांच्या संयुक्त विद्यमाने 'कोकण कला साहित्य गौरव संमेलन सिंधुदुर्गनगरी २०२६' अंतर्गत भव्य पुस्तक प्रकाशन व सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या संमेलनात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत व्यक्ती व संस्थांचा विशेष गौरव करण्यात आला. या दिमाखदार सोहळ्याला ज्येष्ठ संगीतकार अतुल दिवे, राष्ट्रपती व राज्यपाल पुरस्कार विजेते तुषार शिवशरण, राज्य सचिव डॉ. विश्वासराव आरोटे, ज्येष्ठ कलावंत दादा राणे-कोनसकर आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रुती पारकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
संमेलनात साहित्य, कला, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि पत्रकारिता यांसारख्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. तसेच पुस्तकांचे प्रकाशनही करण्यात आले. अशा आयोजनांमुळे नवोदित कलावंत, साहित्यिक व समाजसेवकांना नवी दिशा व प्रेरणा मिळते, असा सूर उपस्थितांनी व्यक्त केला. हे संमेलन प्रा. डॉ. बी. एन. खरात यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्रकुमार चव्हाण यांनी केले, तर यशश्री फाउंडेशनच्या अध्यक्षा ऋतुजा राजेश परब यांनी उपस्थितांचे आभार मानले. साहित्यप्रेमी, कलाकार आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा सोहळा अत्यंत उत्साहात व दिमाखात संपन्न झाला.










