
सावंतवाडी : जिल्ह्यातील सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील वारंवार उद्भवणाऱ्या विजेच्या समस्यांबाबत उपाययोजना करण्यासह व 33 केव्ही वाहिन्या भुमिगत करण्याबाबत उर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी भेट घेतली. मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठकी पार पडली.
माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या विनंतीनुसार उर्जा राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एम.एस.आर.डी.सी. कार्यालय, सातवा मजला, निर्मल भवन, मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आमदार दीपक केसरकर, मुख्य व्यवस्थापकीय संचालक, महावितरण/महा पारेषण, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी, संचालक(संचालक/प्रकल्प/वित्त/वाणिज्य)महावितरण महापारेषण, मुख्य अभियंता रत्नागिरी महावितरण, मुख्य अभियंता कराड महापारेषण, अधीक्षक अभियंता सिंधुदुर्ग, महावितरण व विषयांशी संबंधित इतर सर्व अधिकारी उपस्थित होते.
यावेळी दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ला येथील जास्तीत जास्त भाग हा जंगल, झाडाझुडपानी युक्त आहे. पावसाळ्याच्या काळात मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडत असतात. सोसाट्याचा वारा व वादळामुळे फांद्या तुटून पडत असतात .त्यामुळे विजेच्या तारांना नुकसान पोहोचत असते. भूमिगत वीज वाहिन्या घातल्यास झाडांमुळे होणारा उपद्रव होणार नाही. वाहिन्या तुटण्याचे, पोल पडण्याचे प्रमाण कमी राहील. भूमिगत विद्युत लाईन मुळे वीज पुरवठ्याला व्यत्यय येणार नाही. त्यामुळे मतदारसंघातील विज वाहिन्या या भूमिगत करण्याबाबत श्री. केसरकर यांनी आग्रही मागणी केली.
बैठकीमध्ये सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील वारंवार उद्धवणाऱ्या विजेच्या समस्यांबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचा सूचना मंत्री सौ. बोर्डीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच इतर काही तातडीच्या उपाययोजनांबाबत निर्देशही देण्यात आले. सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील 33 केव्ही विद्युत वाहिनी भूमिगत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ कार्यवाही करण्याबाबत दिलेल्या निर्देशानुसार भूमिगत विद्युत वाहिन्या करण्याचा प्रस्ताव तात्काळ सर्वे करून शासनाच्या मंजुरीसाठी सादर करण्याचे आदेश उर्जा राज्यमंत्री यांनी दिले आहेत.











