
मालवण : शहरातील देऊळवाडा आडारी मार्गालगत दुतर्फा झाडी वाढल्याने वाहतूकीला अडथळा होत होता. तसेच वीज वाहिन्या या झाडीमुळे एकमेकांना चिकटत असल्याने आडारी भागाचा वीज पुरवठा खंडित होत होता. यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी वीज वितरण कंपनीकडे वीज वाहिन्यांवरील झाडी हटविण्याची मागणी केली होती. मात्र वीज अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले.
स्थानिक नागरिकांची मागणी लक्षात घेऊन नगरसेविका नीना मुंबरकर यांनी नगरपरिषद स्वच्छता कर्मचारी आणि जेसीबीच्या सहाय्याने तसेच स्थानिक नागरिकांच्या मदतीने आडारी मार्गावरील वाहतुकिला अडथळा होणारी झाडी तोडण्याची मोहीम सोमवारी सकाळी हाती घेतली. देऊळवाडा आडारी मार्गावरील झाडी तोडल्याने वीज वाहिन्यांना वेलींनी घातलेला वेढा दूर झाला आहे. या मोहिमेत नगरपरिषद स्वच्छता मुकादम वळंजू यांच्या सह सफाई कर्मचारी, स्थानिक नागरिक मोहन फाटक, मुन्ना फाटक, बाळू फाटक, समीर फाटक, निलेश शिरोडकर, संदीप गावकर, मिलिंद फाटक, विद्याधर फाटक, संजय गावकर, अक्षय नाटेकर, हरी भोजणे, आदित्य चव्हाण आदी उपस्थित होते. या कामाबद्दल आडारी भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.












