LIVE UPDATES

वेत्येतील विवाहित युवकाची गोव्यात राहत्या घरी आत्महत्या

Edited by: विनायक गांवस
Published on: June 03, 2026 20:29 PM
views 34  views

सावंतवाडी : मानसिक तणावाखाली असलेल्या एका ४१ वर्षीय विवाहित युवकाने गोव्यात टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मडगाव मायणा-कुडतरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रुमडामळ-दवर्ली येथे काल मंगळवार २ जून रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. रुपेश खांबल (वय ४१, मूळ रा. वेत्ये, ता. सावंतवाडी) असे मृत युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे वेत्ये गावावर शोककळा पसरली असून परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.  

गोव्यातील मायणा-कुडतरी पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत रुपेश खांबल हे गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होते. मंगळवारी सायंकाळी त्यांनी आपल्या राहत्या फ्लॅटमधील बेडरूममध्ये गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. सध्या मृतदेह जिल्हा रुग्णालयाच्या शवगृहात ठेवण्यात आला आहे. मायणा-कुडतरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कपिल नायक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सागर कामत या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.