LIVE UPDATES

पहिल्याच पावसात प्रशासनाची पोलखोल

'पाट-म्हापण' रस्त्यावर पाणीच पाणी
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: June 03, 2026 12:22 PM
views 154  views

कुडाळ : कुडाळ तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पहिल्याच पावसाने बळीराजा सुखावला असला, तरी प्रशासनाचा ढिसाळ कारभार मात्र चव्हाट्यावर आला आहे. पहिल्याच पावसाच्या सरी कोसळताच तालुक्यातील महत्त्वाच्या 'पाट-म्हापण' रस्त्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी तुंबल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे कोंडीत सापडली आहे.

पाट-म्हापण रस्त्याची झालेली दुरवस्था आणि पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांबाबत स्थानिक नागरिकांनी यापूर्वी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी उपोषण केले होते. उपोषणानंतर तरी प्रशासनाला जाग येईल आणि यावर कायमस्वरूपी तोडगा निघेल अशी आशा स्थानिकांना होती. मात्र, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे आजही परिस्थिती 'जैसे थे' आहे.

या रस्त्याच्या कामात तांत्रिक चुका झाल्याचा थेट आरोप स्थानिक करत आहेत. रस्त्याची लेव्हल (पातळी) योग्य नसणे आणि रस्त्याच्या दुतर्फा पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारांची कोणतीही व्यवस्था नसणे, यामुळे आज पहिल्याच पावसात रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे. रस्त्याच्या एका विशिष्ट भागात प्रचंड प्रमाणात पाणी तुंबल्याने नागरिकांना पादचारी म्हणून चालणेही अशक्य झाले आहे.

रस्त्यावर साचलेल्या या गढूळ पाण्यातून जाताना दुचाकी व चारचाकी वाहनांमुळे पादचाऱ्यांवर आणि एकमेकांवर चिखल-पाणी उडत आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्याच्या सुरुवातीलाच वाहनचालक आणि प्रवाशांची 'रंगपंचमी' सुरू झाली असल्याचे उपरोधिक चित्र पाहायला मिळत आहे.

 "पाणी साचून राहिल्यामुळे डांबरी रस्ता अत्यंत वेगाने खराब होतो. जर पहिल्याच पावसात ही अवस्था असेल, तर संपूर्ण पावसाळ्यात या रस्त्याची चाळण होणार हे निश्चित आहे. लाखो रुपये खर्चून तयार केलेला रस्ता प्रशासनाच्या नियोजनाअभावी पुन्हा एकदा खड्ड्यांत जाणार आहे," अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

आता तरी संबंधित लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करणार की नागरिकांना आणखी तीव्र आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागणार? याकडे संपूर्ण कुडाळ तालुक्याचे लक्ष लागले आहे.