
सावंतवाडी : इंग्रजी माध्यमांची रेषा कमी करण्यापेक्षा आपली रेषा मोठी कशी होईल त्या दृष्टिकोनातून शिक्षण विभाग कार्यरत आहे. सिंधुदुर्गतील काही अडीअडचणी आहेत, काही अपेक्षा आहेत. तसेच काही चांगल्या गोष्टी करण्यासाठी दौऱ्यावर आलोय असे मत शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केले. तर उष्णतेची समस्या बघता शाळांच्या वेळेबाबतचे निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यासाठीचे निर्देश देण्यात आलेत अशी माहिती त्यांनी दिली. सावंतवाडीच्या राजघराण्याकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेले असताना मंत्री श्री. भुसे यांचे सावंतवाडीत स्वागत करण्यात आले. राजघराण्याकडून युवराज लखमराजे भोंसले व युवराज्ञी तथा नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपुर्वा बासुर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब, आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, प्रांताधिकारी वीरसिंग वसावे, तहसीलदार श्रीधर पाटील, वेंगुर्ला पंचायत समिती उपसभापती सचिन देसाई आदी उपस्थित होते.
यावेळी मंत्री श्री. भुसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, या विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर महाराष्ट्र व्यापी शिक्षणाचा आढावा घेत आहोत. सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर असताना काही शाळांना भेटी देणे, आढावा बैठका होणार आहेत. कोकण शिक्षणामध्ये आघाडीवर असून दहावी-बारावीमध्ये नेहमीच आघाडीवर राहिलेला सिंधुदुर्ग जिल्हा आहे. म्हणून इथल्या चांगल्या गोष्टी महाराष्ट्रव्यापी कशा नेता येतील त्या दृष्टिकोनातून हा दौरा आहे. स्पर्धा परीक्षा आता सर्वांच्यासाठी खुल्या आहेत. त्यामुळे निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये इथल्या स्थानिक तरुणांना पण या स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करता येईल यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, मराठी शाळांबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, कुठल्याही शाळा बंद होणार नाहीत, याची शासन काळजी घेईल. शाळांची पटसंख्या वाढली पाहिजे, आपली गुणवत्ता वाढली पाहिजे यासाठीही शासन तत्पर आहे कुठेही शाळा बंद होणार नाही, याची शासन काळजी घेईल. तर पाच महिन्यानंतरच्या कालावधीमध्ये टप्पा अनुदान दिले जाईल, अशी घोषणा स्वतः मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मराठी शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाईल. प्रत्येक शाळेमध्ये भौतिक सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिल्या जातील.
इंग्रजी माध्यमांची रेषा कमी करण्याच्या पेक्षा आपली रेषा मोठी कशी होईल, त्या दृष्टिकोनातून विभाग काम करतो आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच उद्याचा भारताचा भावी नागरिक घडत असताना तो प्रखर राष्ट्रभक्त कसा घडेल, येणाऱ्या काळामध्ये तो स्वतःच्या पायावर कसा उभा राहू शकेल, या दृष्टिकोनातून शिक्षण पद्धतीमध्ये बदल करायला घेतलेले आहेत. तर वातावरणीय बदलानुसार शाळांच्या वेळेबाबतचे अधिकार हे प्रत्येक जिल्ह्याला स्थानिक पातळीवर दिलेले आहेत. जशी परिस्थिती निर्माण होईल तसे निर्णय घेतले जातील. विद्यार्थी हे आपलं दैवत आहे असं मत व्यक्त केले. तसेच बेरोजगारीचे प्रश्न निश्चितपणे आहेत. काही ठिकाणी अडीअडचणी आहेत. त्या आम्ही स्वीकारतो. परंतु, ह्या काही काल आणि आज निर्माण झालेल्या अडचणी नाहीत. जे आता आंदोलनं करत आहेत त्यांनी वर्षानुवर्ष सत्ता भोगलेली आहे. कदाचित त्या काळात त्यांनी प्रश्न सोडवले असते, तर ही वेळ आली नसती असा टोला देखील त्यांनी हाणला. तर विद्यार्थ्यांच्याही काही चांगल्या सूचनांचे स्वागत मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे असं मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.
दरम्यान, दीड पावसाचा खंड या निकषामध्ये महाराष्ट्राचे जवळपास २५० पेक्षा जास्त तालुके दुष्काळाच्या छायेत आलेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये या सर्व शेतकऱ्यांच्या पाठीमागे शासन खंबीरपणे उभे राहील. कोकणातही दर वर्षाच्या पेक्षा कमी पाऊस झालेला आहे. भात प्रमुख पीक आहे कोकणातील असून पाऊस कमी झालेला असल्यामुळे याही भागातल्या शेतकऱ्यांचं नुकसान झाल आहे. म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी स्वतः यात लक्ष घातलं असून शेतकऱ्यांच्या पाठीमागे शासन खंबीरपणे उभे राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.










