LIVE UPDATES

मालवणमध्ये ‘जय गणेश मूर्तिकार कारागीर सेवा सहकारी संस्था’ स्थापन

१० नोव्हेंबरला भव्य गणेशमूर्ती प्रदर्शनाचे आयोजन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 07, 2026 06:24 PM
views 69  views
Malvan Ganesh Idol Exhibition by Local Sculptors

मालवण : तालुक्यातील गणेशमूर्ती घडविणाऱ्या मूर्तिकार व कारागीर बांधवांना संघटित व्यासपीठ मिळवून देणे, व्यवसायाला चालना देणे आणि त्यांच्या विविध अडचणी सोडविण्याच्या उद्देशाने 'जय गणेश मूर्तिकार कारागीर सेवा सहकारी संस्था मर्यादित, मालवण' या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी हॉटेल विसावा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

संस्थेचे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांमध्ये अध्यक्ष समीर वर्दम, उपाध्यक्ष उमेश हडकर, सचिव संजय केळुसकर, खजिनदार नारायण माडये, सदस्य हेमंत रामाडे, सुनील केळुसकर, सुशांत तायशेट्ये, बाबुराव चव्हाण, सुधीर पवार, हर्षद घाडीगावकर, पंढरीनाथ नाचणकर, रविंद्र साळकर, सरिता पेडणेकर, जगन्नाथ कोयंडे, शरद गावडे, आप्पाजी चव्हाण, प्रकाश रेवडंकर, प्रकाश पवार, संदीप गावडे आणि संदीप कोळगे यांचा समावेश आहे. 

संस्थेच्या माध्यमातून गणेशमूर्ती निर्मिती या पारंपरिक हस्तकलेचे जतन व संवर्धन केले जाईल. मूर्तिकारांच्या आर्थिक व व्यावसायिक अडचणी दूर करणे आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संस्था कटिबद्ध असेल.

पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, "आमचा पीओपी गणेशमूर्तींना विरोध नाही; मात्र स्थानिक पारंपरिक मूर्तिकारांच्या कलेला प्रोत्साहन मिळून त्यांच्या हाताला वर्षभर काम मिळाले पाहिजे. मातीच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती हीच सिंधुदुर्गची खरी ओळख आणि अभिमान बनली पाहिजे. स्थानिकांनी घडविलेल्या या मातीच्या मूर्तींना 'सिंधुदुर्ग ब्रँड' म्हणून राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत."

सिंधुदुर्गातील मूर्तिकलेला नवी ओळख मिळवून देण्यासाठी संस्थेच्या वतीने १० नोव्हेंबर रोजी मालवण येथील भरड भागातील श्री दत्त मंदिरात सकाळी १० ते रात्री ११.३० वाजेपर्यंत भव्य गणेशमूर्ती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जवळपास ४५ हून अधिक युवा व नामांकित मूर्तिकार यात सहभागी होणार आहेत. प्रदर्शनात 'सिंधुगणेश ब्रँड'च्या वैशिष्ट्यपूर्ण व आकर्षक मूर्ती पाहायला मिळतील.

जिल्ह्यातील ज्येष्ठ मूर्तिकार व मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट ५ मूर्तींची निवड करून संबंधित मूर्तिकारांचा विशेष सन्मान करण्यात येईल.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या या समृद्ध कलापरंपरेला प्रोत्साहन देण्यासाठी मालवण व परिसरातील गणेशभक्त, कलाप्रेमी आणि नागरिकांनी या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन 'जय गणेश मूर्तिकार कारागीर सेवा सहकारी संस्थे'च्या वतीने करण्यात आले आहे.