
३० लाखांचा गुटखा जप्त
तिघांच्या आवळल्या मुसक्या
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात अवैध गुटखा तस्करीविरोधात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पुन्हा एकदा मोठी कारवाई करत गोवा-मुंबई महामार्गावर तब्बल ३० लाख १३ हजार ४५० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखूजन्य पदार्थ आणि मालवाहू वाहन जप्त केले. या कारवाईत तिघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध अन्नसुरक्षा व मानके कायदा तसेच भारतीय न्यायसंहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ३ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ओरोस खर्येवाडी येथील खालसा पंजाबी ढाब्यासमोरील गोवा-मुंबई महामार्गावर सापळा रचून ही धडक कारवाई केली. या कारवाईत गोपाळ राजाराम गवस (रा. दापोली-अन्नपूर्णावाडी, ता. सावंतवाडी), शिरीष सुभाष गवळी (रा. माठेवाडा, सावंतवाडी) आणि सिद्धेश सुभाष केसरकर (रा. आळेवाडी, बांदा, ता. सावंतवाडी) यांना ताब्यात घेण्यात आले. झडतीदरम्यान २१ लाख ६३ हजार ४५० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधी तंबाखूजन्य पदार्थ तसेच ८ लाख ५० हजार रुपयांचे अशोक लेलँड 'बडा दोस्त' मालवाहू वाहन असा एकूण ३० लाख १३ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी आरोपींविरुद्ध अन्नसुरक्षा व मानके कायदा, २००६ मधील कलम २६(२), ७(३)(ड), २७(३)(ई), ३०(२)(अ), ५९ तसेच भारतीय न्यायसंहिता, २०२३ मधील कलम १२३, २२३, २७४, २७५ व ३(५) अन्वये सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर व अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या नेतृत्वात पीएसआय हनुमंत भोसले, एएसआय सुरेश राठोड, पोलीस हेडकॉन्स्टेबल विल्सन डिसोझा, आशिष जामदार तसेच पोलीस कॉन्स्टेबल महेश्वर समजीसकर व ऋषिकेश टोपले यांनी यशस्वीरित्या पार पाडली










