LIVE UPDATES

आपल्या कृतीमुळे समाजाला अभिमान वाटेल असे वर्तन ठेवा : संजय वेतुरेकर

शिक्षक भारतीतर्फे नवनियुक्त मुख्याध्यापकांचा सत्कार
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 04, 2026 12:31 PM
views 31  views

  •  शिक्षक भारतीतर्फे नवनियुक्त मुख्याध्यापकांचा सत्कार
  •  होतकरू विद्यार्थिनीला सायकल भेट

देवगड (प्रतिनिधी)

विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर करताना सावधगिरी बाळगावी. चांगल्या-वाईटाची पारख करून योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित केली तर आयुष्यातील निर्णय कधीही चुकीचे ठरत नाहीत. आपल्या कृतीमुळे पालक, शिक्षक आणि समाजाला अभिमान वाटेल असे वर्तन विद्यार्थ्यांनी ठेवावे, असे प्रतिपादन शिक्षक भारतीचे राज्य कार्यवाह संजय वेतुरेकर यांनी केले.शिक्षक भारती संघटनेच्या वतीने देवगड तालुक्यातील नवनियुक्त मुख्याध्यापकांचा सत्कार तसेच गरजू होतकरू विद्यार्थ्यांना सायकल वितरण सोहळा  शिरगाव हायस्कूलच्या सभागृहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना वेतुरेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

ते म्हणाले, विद्यार्थ्यांच्या यशाचा आनंद केवळ पालकांनाच नव्हे, तर शिक्षकांनाही तितकाच होतो. प्रत्येकाने योग्य वयात योग्य कर्तव्य पार पाडावे. शिरगाव हायस्कूलची उज्ज्वल शैक्षणिक परंपरा विद्यार्थ्यांनी अधिक समृद्ध करावी, असे आवाहन त्यांनी केले.यावेळी शिक्षक भारतीतर्फे शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे नवनियुक्त मुख्याध्यापक उदयसिंग रावराणे तसेच नारिंग्रे हायस्कूलच्या नवनियुक्त मुख्याध्यापिका श्रेया तावडे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि पर्यावरणपूरक भेटवस्तू म्हणून रक्तचंदन, कापूर व धूपाची रोपे देऊन सत्कार करण्यात आला.

कट्टा हायस्कूलचे दिवंगत मुख्याध्यापक कै. संजय नाईक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी जिल्ह्यातील एका होतकरू गुणवंत विद्यार्थ्याला सायकल भेट देण्याचा उपक्रम शिक्षक भारतीतर्फे राबविला जातो. यंदा शिरगाव हायस्कूलची विद्यार्थिनी देवांश्री गुरव हिला सायकल प्रदान करण्यात आली.कार्यक्रमाला शाळा समितीचे चेअरमन विजयकुमार कदम, सदस्य दिनेश साटम, शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत आडेलकर, उपाध्यक्ष जनार्दन शेळके, रुपेश बांदेकर, सत्यपाल लाडगांवकर, सहसचिव उमेश कोयंडे, संघटक आकाश पारकर, सागर फाळके, तालुकाध्यक्ष हेमंत सावंत, सतीशकुमार कर्ले, अर्जुन चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. टी. पाटील यांनी केले, तर आभार कृष्णा कदम यांनी मानले.