
कै. विनायक चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य
'विनायक भारती प्रतिष्ठान'च्या समाजसेवेच्या वारशाचे जि प. अध्यक्षांकडून कौतुक
कुडाळ :
"माझ्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त वह्या वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करून त्याचा समाजसेवेचा वारसा चालू ठेवल्याबद्दल मी ॲड. रजत चव्हाण व श्रीमती भारती चव्हाण यांचे मनापासून आभार मानतो," असे गौरवोद्गार सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत यांनी काढले.कै. विनायक नामदेव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त 'विनायक भारती प्रतिष्ठान'च्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबडपाल आणि लिंगेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तुळसुली येथील एकूण ४०० विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्ष प्रमोद कामत बोलत होते.आपल्या भावना व्यक्त करताना अध्यक्ष प्रमोद कामत म्हणाले की, "आजचा दिवस माझ्यासाठी भावनिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे. विनायक चव्हाण हे माझे जीवलग मित्र होते. मला त्यांचे मार्गदर्शन वेळोवेळी मिळाले. स्वर्गीय आबा मुंज आणि विनायक चव्हाण यांच्यासोबत विकासाच्या अनेक योजनांवर आम्ही चर्चा करायचो." अशा शब्दांत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांनी सुरुवातीच्या काळात स्वर्गीय विनायक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली काम केल्याचे सांगत या उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, "शिक्षण ही यशाची पहिली पायरी असून मोठ्या स्वप्नांची सुरुवात शाळेतूनच होते. उद्याच्या विकसित भारताचे भविष्य विद्यार्थ्यांच्या हातात आहे. भविष्यात यशस्वी झाल्यानंतर आपल्या कुटुंबाप्रमाणेच शाळेकडेही लक्ष दिले पाहिजे, याचा एक नवा आदर्श ऍड. रजत चव्हाण यांनी घालून दिला आहे."कुडाळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद नाईक यांनी तुळसुली हे आपले जन्मगाव असल्याचे अभिमानाने सांगत या आगळ्यावेगळ्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. "विनायक चव्हाण हे सामाजिक कार्यकर्ते म्हणून आंबडपाल पंचक्रोशीत कार्यरत होते. त्यांच्या निधनानंतर विनायक भारती प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली वाहण्याचे काम कुटुंब करत आहे," अशा शब्दांत त्यांनी ऍड. रजत चव्हाण व श्रीमती भारती चव्हाण यांचे कौतुक केले.विनायक भारती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ऍड. रजत चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, "मी याच शाळेचा माजी विद्यार्थी असून, आजच्या या उपक्रमाच्या निमित्ताने मला माझ्या शाळेचे ऋण फेडण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे."या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य दीपक नारकर, रुपेश कानडे, बार कौन्सिलचे अध्यक्ष ऍड. सुरेंद्र माळगावकर, प्रतिष्ठानच्या अध्यक्षा भारती चव्हाण, उपकार्याध्यक्ष सदानंद वारंग, जॉईंट सेक्रेटरी ए.पी. वारंग, शाळा समिती सल्लागार मकरंद नाईक आणि माईनकर गुरुजी उपस्थित होते.तसेच आंबडपाल येथील कार्यक्रमात कुडाळचे मंडळ अधिकारी मसुरकर, तलाठी श्रीमती अरदकर, सरपंच महेश मेस्त्री, शाळा कमिटीचे अध्यक्ष सुरेश तानिवडे, उपाध्यक्ष भगवान सावंत, मुख्याध्यापिका कदम , ग्रामपंचायत सदस्य गणपत चव्हाण, प्रज्ञा सावंत यांच्यासह सचिन सावंत, सुदाम सावंत, किशोर सावंत, ओंकार नाईक, महेंद्र नाईक, प्रेरणा नाईक, शरद चव्हाण, सारिका कुडाळकर, विशाखा सावंत, सुनंदा सावंत आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या शिक्षिका मनाली नाईक यांनी केले. प्रास्ताविक अनिल वारंग यांनी मांडले, तर उपस्थितांचे आभार स्मिता परब यांनी मानले. या स्तुत्य उपक्रमाचे संपूर्ण पंचक्रोशीतून व सर्व स्तरातून कौतुक होत आहे.










