LIVE UPDATES

नगराध्यक्षांची कडवी फाईट ; संजू परबांनी निरवडेकरांच्या साथीने जिंकला डाव

निमित्त नगराध्यक्ष चषक स्पर्धेचं
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 04, 2026 12:50 PM
views 224  views
#kokansadlive#news update#konkan update#

 निमित्त नगराध्यक्ष चषक स्पर्धेचं

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेकडून पुण्यश्लोक हि. हा. श्रीमंत मेजर पंचम खेमराज तथा बापूसाहेब महाराज पुण्यतिथीनिमित 'जिल्हास्तरीय नगराध्यक्ष चषक स्पर्धा २०२६' आयोजित करण्यात आली आहे. यानिमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, माजी नगराध्यक्ष संजू परब आणि नगरसेवक अजय गोंदावळे यांच्यातही कॅरमचा डाव रंगला. श्री. परब आणि ॲड. निरवडेकर यांच्या टीमने हा डाव जिंकला. मात्र, नगराध्यक्षांनी देखील शेवटपर्यंत कडवी झुंज देत डाव जिंकण्याचा प्रयत्न केला. 

नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी ओपनिंग करत कॅरमच्या डावाला सुरुवात केली. सहकारी म्हणून नगरसेवक अजय गोंदावळे त्यांच्या टीममध्ये होते. तर उपनगराध्यक्ष ॲड .अनिल निरवडेकर आणि माजी नगराध्यक्ष संजू परब हे प्रतिस्पर्धी समोर होते. राजकारणात मुरलेले हे दिग्गज कॅरमच्या खेळातही सरस ठरले. श्री. परब यांनी आपल्या धुरंधर खेळीने जोरदार सुरूवात केली. तर उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांचीही खंबीर साथ त्यांना लाभली. क्वीन आणि कव्हर घेत ॲड. निरवडेकर यांनी डाव आपल्या बाजूने वळवला. मात्र, नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी देखील यावेळी कडवी झुंज दिली. अजय गोंदावळेंची साथ त्यांना मिळाली. प्रतिस्पर्धींच्या केवळ दोन सोंगट्या बोर्डवर उपनगराध्यक्ष ॲड. निरवडेकर यांनी शेवटची सोंगटी कव्हर करत हा डाव जिंकला. यावेळी हा महायुतीचा कॅरमचा डाव होता. संजू परब आणि ॲड. अनिल निरवडेकर एकत्र असले की डाव जिंकला जातो, अशी मिश्किल टिपणीही यावेळी माजी नगराध्यक्ष श्री. परब यांनी केली. इतरवेळी नगरपरिषदेच्या राजकारणात आमने- सामने असणारे हे दिग्गज आज कॅरम बोर्डवर एकत्र दिसले. बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा कॅरम खेळण्याचा आनंद त्यांनी लूटला. यावेळी क्रीडा सभापती सुधीर आडीवरेकर, दिपाली भालेकर, सुकन्या टोपले, ॲड. सिद्धार्थ भांबुरे आदींसह नगरपरिषदेच अधिकारी, कर्मचारी, स्पर्धक विद्यार्थ्यी मोठ्या संख्येने उपस्थित होते.