
पणजी : केरये महामार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनर ट्रकला बुलेट दुचाकीची धडक बसल्याने शुक्रवारी अपघात झाला. या अपघातात पंढरपूर येथील दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवरील त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. धडकेत दुचाकीचा चेंदामेंदा झाला. याबाबतची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास राजस्थानहून माल घेऊन फोंड्याकडे आलेला आरजे ०६ जीसी ९९८९ क्रमांकाचा कंटेनर ट्रक केरये येथे महामार्गाच्या कडेला अचानक नादुरुस्त झाला. त्यामुळे चालकाने ट्रक रस्त्याच्या बाजूला थांबवून दुरुस्तीचे काम सुरू केले होते.
महाराष्ट्रातून फोंड्याच्या दिशेने एमएच १३ एफबी ५०१९ क्रमांकाची बुलेट दुचाकी भरधाव वेगाने येत होती. चालकाचे नियंत्रण सुटल्याने किंवा समोर उभा असलेला ट्रक वेळीच न दिसल्याने बुलेट कंटेनरच्या मागील भागावर जोरदार आदळली. धडक इतकी भीषण होती की दुचाकी चालकाला गंभीर दुखापत होऊन त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दुसरा स्वारही या धडकेत गंभीर जखमी झाला.
दरम्यान, महामार्गावर वाहन थांबविताना आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली नसल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. भीषण अपघातात उद्धव बाळासाहेब कोळी (वय २५ रा. पंढरपूर) या मोटरसायकल चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवरील त्याचा मित्र अभिषेक भीमराव धावरे (वय २५, रा. पंढरपूर) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.










