LIVE UPDATES

‘महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर’मध्ये सिंधुदुर्गवासीयांनी सहभागी व्हावे

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे आवाहन : जलसंधारण दिनानिमित्त २१ ऑगस्टला सिंधुदुर्गनगरीत आयोजन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 17, 2026 16:44 PM
views 36  views

सिंधुदुर्गनगरी : ‘माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा’ हा संदेश जनमानसात पोहोचविण्यासाठी २१ ऑगस्ट २०२६ रोजी जलसंधारण दिनानिमित्त सिंधुदुर्गनगरी येथे ‘महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर’ आयोजित करण्यात येणार आहे. मृद व जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप देण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमात जिल्ह्यातील नागरिक, युवक, विद्यार्थी, महिला, शासकीय अधिकारी-कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे.

सिंधुदुर्गनगरी येथील पोलीस परेड ग्राऊंडपासून या वॉकेथॉनला सुरुवात होणार असून, डॉन बॉस्को सर्कल, जिल्हा परिषद मुख्य गेट, जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्गनगरी नर्सिंग कॉलेज मार्गे पुन्हा पोलीस परेड ग्राऊंड येथे वॉकेथॉनची सांगता होणार आहे. या उपक्रमात कमाल ३ किलोमीटर अंतराचे चालणे आणि मृद व जलसंधारणाची शपथ घेण्यात येणार आहे. १५ वर्षे व त्यावरील महिला व पुरुषांना या वॉकेथॉनमध्ये सहभागी होता येणार असून, सहभागी प्रत्येक व्यक्तीस टिशर्ट आणि वैयक्तिक किट, ई-प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. वॉकेथॉनसाठी क्यूआर आधारित ऑनलाइन नोंदणी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

माती आणि पाणी ही पुढील पिढ्यांची अमूल्य नैसर्गिक संपत्ती आहे. त्यांचे संवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून समाजातील प्रत्येक घटकाची सामूहिक जबाबदारी आहे. ‘महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर’च्या माध्यमातून जलसंधारणाचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवक, विद्यार्थी, नागरिक आणि विविध संस्था यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन ही वॉकेथॉन लोकचळवळीचे प्रभावी माध्यम बनवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे. नोंदणीसाठी  https://register.mahaevent.co.in/#/ या लिंकवर क्लिक करावे.