
देवगड : महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाच्या ‘चला शाळेत जाऊया’ या अभियानांतर्गत राज्यस्तरावरील अधिकाऱ्यांना प्रत्येकी एका जिल्ह्याची जबाबदारी देऊन शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा घेणे व आवश्यक मार्गदर्शन करण्याच्या सूचना शिक्षण आयुक्तांच्या पत्रानुसार देण्यात आल्या आहेत.
त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी नोडल अधिकारी म्हणून शिक्षण उपसंचालक, शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे येथील सुभाष चौगुले यांची निवड करण्यात आली आहे.चौगुले ९ व १० सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी देवगड तालुक्यातील जामसंडे नं १ व कुणकेश्वर नं १ शाळांना भेट देऊन शाळेतील शैक्षणिक कामकाजाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शिक्षकांशी संवाद साधत शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक मार्गदर्शन केले.
त्यानंतर चौगुले यांनी देवगड पंचायत समितीला भेट देऊन उपसभापती अमोल लोके व गटविकास अधिकारी निलेश जगताप यांच्याशी शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी कोणते उपक्रम राबविता येतील, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती आणखी प्रभावी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी अमोल लोके यांनी चौगुले यांचे स्वागत केले.
देवगड तालुक्यातील शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतल्यानंतर चौगुले यांनी समाधान व्यक्त केले. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी उपसभापती अमोल लोके हे सातत्याने शाळांना भेटी देऊन शिक्षक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असल्याचे नमूद करत त्यांनी लोके यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.शिक्षण क्षेत्राच्या गुणवत्तावाढीसाठी लोकप्रतिनिधींनी अशा पद्धतीने सक्रिय सहभाग घेतल्यास तालुक्याचा शैक्षणिक दर्जा निश्चितच उंचावण्यास मदत होईल, असे सुभाष चौगुले यांनी सांगितले. त्यांच्या या दौऱ्यामुळे देवगड तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना अधिक बळ मिळणार आहे.












