LIVE UPDATES

आंतरराष्ट्रीय वृद्ध दिनानिमित्त जिव्हाळा सेवाश्रम येथे कायदेविषयक मार्गदर्शन

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 01, 2026 17:56 PM
views 29  views

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने आंतरराष्ट्रीय वृद्ध दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांच्या हक्क, अधिकार व कायदेशीर संरक्षणाबाबत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. कुडाळ तालुक्यातील माड्याची वाडी येथील ‘जिव्हाळा सेवाश्रम’ येथे १ ऑक्टोबर २०२६ रोजी हा कार्यक्रम झाला.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष डॉ. सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. व्ही. नडगदल्ली, ॲड. रूपाली प्रभू, सखी वन स्टॉप सेंटरचे समुपदेशक महेंद्र जाधव, जिव्हाळा सेवाश्रमचे अध्यक्ष सुरेश बिर्जे, जयप्रकाश प्रभू, गितांजली बिर्जे व प्राजक्ता केळूसकर उपस्थित होते.

यावेळी आर. व्ही. नडगदल्ली यांनी ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे हक्क व अधिकार तसेच त्यांच्यासाठी असलेल्या कायदेशीर तरतुदींची माहिती दिली. अन्याय झाल्यास त्याविरुद्ध कोणाकडे दाद मागता येते, याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.

ॲड. रूपाली प्रभू यांनी ज्येष्ठ नागरिकांचे कायदेशीर हक्क, कल्याण, संरक्षण, प्रतिष्ठा आणि न्याय मिळण्याच्या अधिकाराबाबत मार्गदर्शन केले. ज्येष्ठ नागरिकांच्या संरक्षणासाठी ज्येष्ठ नागरिकांचे देखभाल व कल्याण अधिनियम, २००७ अंतर्गत उपलब्ध तरतुदींची माहिती त्यांनी दिली.

मुलांकडून वृद्ध आई-वडिलांची देखभाल केली जात नसल्यास संबंधित ज्येष्ठ नागरिकांना उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे अर्ज करता येतो. दाखल झालेला अर्ज ९० दिवसांच्या आत निकाली काढला जातो व त्याच्या मुलांना नोटीस काढून मुलांच्या उत्पनांची मर्यादा बघून जास्तीत जास्त १० हजार रुपये पर्यंत मासिक निर्वाह भत्ता दिला जातो. अशा प्रकरणांमध्ये कायद्यानुसार कार्यवाही करण्यात येते, अशी माहिती त्यांनी दिली.

ज्येष्ठ नागरिकांना कुटुंबातील सदस्यांकडून होणारा त्रास, दुर्लक्ष किंवा अन्याय सहन करावा लागू नये, यासाठी उपलब्ध कायदेशीर मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. समुपदेशक महेंद्र जाधव यांनी ज्येष्ठ नागरिकांना उर्वरित आयुष्य आनंदी, निरोगी आणि सकारात्मक पद्धतीने जगण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्गच्या कंत्राटी लिपिक श्वेता सावंत यांनी केले.