LIVE UPDATES

स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत जिल्हास्तरीय श्रमदानाचा शुभारंभ

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 01, 2026 17:24 PM
views 38  views

सिंधुदुर्ग : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत ‘एक दिवस, एक तास, एक सोबत’ या संकल्पनेवर आधारित राष्ट्रव्यापी श्रमदान उपक्रमाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हास्तरीय शुभारंभ ग्रामपंचायत डेगवे, सावंतवाडी येथे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

यावेळी पंचायत समिती सावंतवाडीच्या सभापती सुश्मिता जाधव, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) अंजिक्य सावंत, गटविकास अधिकारी निलेश जाधव, सरपंच राजन देसाई, उपसरपंच मंगेश देसाई, सोसायटी चेअरमन प्रविण देसाई, माजी सभापती भगवान देसाई, देवस्थान अध्यक्ष सिताराम देसाई, ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमातून स्वच्छता ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे, असा संदेश देण्यात आला. लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे श्रमदानात सहभागी होत ग्रामपंचायत परिसर तसेच सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता केली. स्वच्छ व सुंदर परिसर निर्माण करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी स्वच्छतेचे मानवी जीवनातील महत्त्व अधोरेखित केले. स्वच्छता ही केवळ एक दिवसाची मोहीम नसून ती आपल्या दैनंदिन जीवनशैलीचा अविभाज्य भाग झाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

स्वच्छ परिसराचा नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंध असून अस्वच्छतेमुळे विविध आजारांना आमंत्रण मिळू शकते. त्यामुळे घरासोबतच परिसर, सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, जलस्रोत आणि सार्वजनिक संस्थांच्या परिसराची स्वच्छता राखणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. स्वच्छतेसाठी शासनाच्या विविध उपक्रमांसोबत नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. प्रत्येकाने स्वतःपासून स्वच्छतेची सुरुवात केल्यास स्वच्छ आणि निरोगी समाज निर्माण होण्यास मदत होईल, असेही श्री. कामत यांनी सांगितले.

स्वच्छ पाणी, स्वच्छ परिसर, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन, प्लास्टिकचा कमीत कमी वापर तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकण्याबाबत त्यांनी नागरिकांना आवाहन केले. ‘एक दिवस, एक तास, एक सोबत’ या संकल्पनेतून नागरिकांनी एकत्र येऊन श्रमदान केल्यामुळे स्वच्छतेबाबत जनजागृती होण्यासोबतच सामाजिक सहभागाची भावना अधिक दृढ होते. या उपक्रमाच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

‘स्वच्छता ही सेवा’ अभियान १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असून, या कालावधीत विविध स्वच्छता उपक्रम, जनजागृती कार्यक्रम आणि श्रमदानाचे आयोजन करण्यात येत आहे. २ ऑक्टोबर रोजी स्वच्छ भारत दिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होऊन ‘स्वच्छ सिंधुदुर्ग, सुंदर सिंधुदुर्ग’ या संकल्पनेला बळ द्यावे आणि स्वच्छता ही केवळ अभियानापुरती मर्यादित न ठेवता दैनंदिन जीवनाचा भाग बनवावी, असे आवाहन जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्यावतीने करण्यात आले आहे.