LIVE UPDATES

लाखोंचा खर्च पण , बंधाऱ्यांमध्ये नाही पाणी

गीता काळे आणि आनंद रावले यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 22, 2026 04:56 PM
views 45  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

सिंधुदुर्गनगरी  : लाखो रुपये खर्चून बांधलेल्या तीन पक्क्या बंधाऱ्यांमध्ये एकदाही पाणी अडविण्यात आले नसल्याचा आरोप करत वरची गुरामवाडी येथील गीता काळे आणि आनंद रावले यांनी गुरुवारपासून (२२ ऑक्टोंबर) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. बंधाऱ्यांमध्ये प्लेट्स टाकून पाणी अडविण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

  वरची गुरामवाडी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील वाईरकरवाडी येथे २०१६ मध्ये २४ लाख ९३ हजार १३५ रुपये खर्चून पक्का बंधारा बांधण्यात आला. गुरामवाडीतील तेलीवाडी उभाधोंडा येथे २०१९ मध्ये १७ लाख ८५ हजार ३२१ रुपये खर्चून दुसरा बंधारा उभारण्यात आला. या दोन्ही बंधाऱ्यांची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी पेंडूर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीकडे सोपविण्यात आली आहे.

  तसेच कट्टा बाजारपेठ येथे २०२१ मध्ये १८ लाख १२ हजार ८८ रुपये खर्चून तिसरा बंधारा बांधण्यात आला. या बंधाऱ्याची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे आहे. मात्र, तिन्ही बंधारे बांधूनही त्यामध्ये आजवर पाणी अडविण्यात आले नसल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे.

तीन वर्षे पाठपुरावा, तरीही कार्यवाही नाही 

 बंधाऱ्यांमध्ये पाणी अडविण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून पाठपुरावा सुरू असल्याचे उपोषणकर्त्यांनी निवेदनात म्हटले आहे. यासंदर्भात पेंडूर विविध कार्यकारी सहकारी सोसायटी आणि वरची गुरामवाडी ग्रामपंचायतीकडे विनंती अर्जही सादर करण्यात आले. मात्र, अद्याप बंधाऱ्यांमध्ये प्लेट्स टाकून पाणी अडविण्याची कार्यवाही झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

एकीकडे जिल्ह्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसंधारणाच्या उपाययोजना राबविल्या जात असताना, दुसरीकडे लाखो रुपये खर्चून बांधलेल्या बंधाऱ्यांमध्ये पाणी अडविण्याची व्यवस्था नसल्याने या निधीचा अपेक्षित उपयोग होत नसल्याचा मुद्दा उपोषणकर्त्यांनी उपस्थित केला आहे.

 बंधाऱ्यांमध्ये तातडीने पाणी अडविण्याची व्यवस्था करावी, या मागणीसाठी गीता काळे आणि आनंद रावले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.