LIVE UPDATES

बबन मिंडे यांना जयंत पवार कादंबरी पुरस्कार

प्रकाश रामचंद्र रसाळ स्मृती भूमी काव्य पुरस्कार कवी सुरेश राघव यांना जाहीर
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 22, 2026 04:16 PM
views 24  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

कणकवली : समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्गतर्फे दिल्या जाणाऱ्या २०२६ च्या साहित्यिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. ज्येष्ठ लेखक जयंत पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा कादंबरी पुरस्कार कादंबरीकार बबन मिंडे यांच्या 'स्टॅच्यू ऑफ डेमोक्रसी' (विश्वकर्मा पब्लिकेशन) या कादंबरीला, तर प्रकाश रामचंद्र रसाळ स्मृती भूमी काव्य पुरस्कार कवी सुरेश राघव यांच्या 'जरुरी काम पुढील पिढीसाठी'  (ललित पब्लिकेशन) या काव्यसंग्रहाला जाहीर झाला आहे. प्रत्येकी दहा हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.ज्येष्ठ कादंबरीकार राजन गवस, समीक्षक प्रा. नितीन रिंढे आणि रणधीर शिंदे यांच्या निवड समितीने ही निवड केली असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर आणि प्रमुख कार्यवाह सुरेश बिले यांनी दिली.

  समाज साहित्य प्रतिष्ठानतर्फे गेल्या काही वर्षांपासून विविध साहित्य प्रकारांत पुरस्कार देऊन उत्तम साहित्यकृतीचा गौरव करण्यात येतो. यंदा कादंबरी आणि कविता या दोन विभागांत पुरस्कार देण्यात आले. कादंबरी या विभागात जयंत पवार पुरस्कारासाठी कादंबरीकार बबन मिंडे यांची निवड करण्यात आली. प्रसिद्धी आणि साहित्यिक गटबाजीपासून स्वतःला दूर ठेवणारे लेखक म्हणून श्री मिंडे ओळखले जातात. 'लँड माफिया', 'गावई', 'सत्याग्रह', 'गुलामराजा' अशा गाजलेल्या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या आहेत.

आणि त्या पॉप्युलर प्रकाशन,राजहंस प्रकाशन, मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस,विश्वकर्मा पब्लिकेशन अशा प्रतिष्ठित प्रकाशन संस्थान कडून प्रकाशित झाल्या आहेत. त्यांच्या लेखनातून दैनंदिन जीवनव्यवहार, संघर्ष, मानवी नातेसंबंध, सामाजिक ताणेबाणे, बदलते राजकारण आणि निसर्ग अशा समाजजीवनातील महत्त्वाच्या गोष्टी प्रकर्षाने येतात. 'स्टॅच्यू ऑफ डेमोक्रसी' मधून आजच्या वर्तमानातील विविध वैयक्तिक, सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक ताणतणावांना ते भिडले आहेत.

तर प्रकाश रामचंद्र रसाळ स्मृती भूमी पुरस्कार प्राप्त 'जरुरी काम पुढील पिढीसाठी' हा सुरेश राघव यांचा कवितासंग्रह म्हणजे ज्या काळात शांत राहणेच शहाणपण समजले जाते, अशा काळातील अस्वस्थ करणारे काव्यविश्व आहे. आजच्या भांडवली, आत्मकेंद्री आणि संवेदनहीन व्यवस्थेवर उगारलेला हा वैचारिक चाबूक आहे. सुखवस्तू वर्गाचे मनोरंजन न करता शोषितांचा संघर्ष, राजकीय दांभिकता आणि महानगरीय अगतिकतेवर थेट प्रहार करणारी, रंगभूमीचे भान आणि मार्क्सवादी-आंबेडकरी विचारांची प्रगल्भता लाभलेली ही कविता आहे.

 दरम्यान, डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मालवण येथे होणाऱ्या सहाव्या समाज साहित्य विचार संमेलनात या पुरस्कारांनी कादंबरीकार बबन मिंडे आणि कवी सुरेश राघव यांना गौरविण्यात येणार आहे.