LIVE UPDATES

१० हजार कच्चे बंधारे उभारण्याची मोहीम

Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: October 05, 2026 17:29 PM
views 73  views

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या ३५ ते ४० वर्षांतील सर्वात कमी पावसाची नोंद झाली असून भूगर्भातील पाण्याची पातळी कमालीची खालावली आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत राज्य शासनाने जिल्ह्यात 'दुष्काळ ट्रिगर-१' लागू केला आहे. या भीषण जलसंकटावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली असून, वाहून जाणारे पाणी स्थानिक पातळीवर अडवण्यासाठी व जिरवण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात १० हजार कच्चे बंधारे उभारण्याची व्यापक मोहीम युद्धपातळीवर हाती घेतली आहे.

जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने राबवल्या जाणाऱ्या या अभियानात कच्चे बंधारे, वनराई बंधारे आणि 'जलतारा' यांसारखे कमी खर्चाचे व प्रभावी उपाय योजले जात आहेत. या मोहिमेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे शाळा, महाविद्यालये, अशासकीय संस्था (NGOs) आणि स्थानिक नागरिकांचा लाभलेला उत्स्फूर्त लोकसहभाग. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आकलनानुसार जिल्ह्यात १०,००० बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट असून, अवघ्या चार दिवसांत ५०० हून अधिक बंधारे पूर्ण झाले आहेत. कामाचा हा वाढता वेग पाहता जलसंरक्षणाची ही मोहीम लोकचळवळ बनत असल्याचे चित्र आहे.

याशिवाय, नद्या-नाल्यांमधील गाळ काढणे, कॉजवे अडवणे आणि पक्क्या बंधाऱ्यांची दुरुस्ती करणे यांसारख्या तांत्रिक कामांची धोरणे सोपी करण्यासाठी जलसंरक्षण विभागाशी चर्चा सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या या आक्रमक आणि नियोजनबद्ध उपक्रमाची दखल वरिष्ठ पातळीवर तसेच राज्यातील इतर जिल्ह्यांकडूनही घेतली जात आहे असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

'पाणी अडवा, पाणी जिरवा' या धोरणानुसार कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथे पत्रकार, प्रशासन आणि विद्यार्थ्यांच्या संयुक्त सहभागातून कच्चा बंधारा बांधण्यात आला. या उपक्रमात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, प्रांत अधिकारी ऐश्वर्या काळुसे, तहसीलदार सचिन पाटील, नायब तहसीलदार अमरसिंह जाधव, कृषी अधिकारी भास्कर चौगुले, जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर, पिंगुळी सरपंच अजय आकेरकर, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश तोरसकर, कुडाळ तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय पालकर, पत्रकार प्रमोद म्हाडगुत, रोहन नाईक, संजय तेंडोलकर, निलेश ओरोसकर, छायाचित्रकार प्रसाद राणे यांच्यासह SRM कॉलेजचे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.