
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील पोखरण गावचे रहिवासी आणि गुरुदास सांप्रदायातील सुप्रसिद्ध भजनकार समीर कदम बुवा यांचे रविवारी पहाटे दुःखद निधन झाले. आपल्या गोड आणि भावस्पर्शी आवाजाने भजन व भक्तिगीतांच्या माध्यमातून त्यांनी रसिक श्रोत्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले होते. त्यांच्या अकस्मात निधनाने पोखरण गावासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजन व सांप्रदायिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
भजनकार समीर कदम यांच्या निधनाचे वृत्त समजताच माजी आमदार वैभव नाईक यांनी पोखरण येथे कदम कुटुंबीयांची भेट घेतली. या वेळी त्यांनी कदम कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांचे सांत्वन केले आणि समीर कदम बुवा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. समीर कदम यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, भाऊ आणि काका असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कोकणातील भजन परंपरेची मोठी हानी झाली असून सर्व स्तरांतून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.










