LIVE UPDATES

पोखरणचे भजनकार समीर कदम बुवा यांचं निधन

Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: September 13, 2026 13:37 PM
views 325  views

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील पोखरण गावचे सुप्रसिद्ध भजनकार तसेच गुरुदास सांप्रदायाचे खंदे पुरस्कर्ते समीर कदम बुवा यांचे रविवारी पहाटे सुमारे २.१५ वाजता अकस्मात दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच पोखरण गावासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजनप्रेमी व सांप्रदायिक क्षेत्रात प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे.

आपल्या अत्यंत मधुर, सुरेल आणि भावस्पर्शी आवाजाने समीर कदम बुवा यांनी भजन व भक्तिगीतांच्या माध्यमातून रसिक श्रोत्यांच्या मनात अनन्यसाधारण स्थान निर्माण केले होते. 'भजन हाच श्वास आणि भक्ति हीच ओळख' या निष्ठेने त्यांनी आयुष्यभर सांप्रदायिक सेवा केली. अनेक धार्मिक व सांस्कृतिक मंचांवरून आपल्या भजनाने त्यांनी हजारो रसिकांना मंत्रमुग्ध केले होते.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, भाऊ आणि काका असा मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या या अचानक जाण्याने कदम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, कोकणातील भजन परंपरेची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज पोखरण येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार असून, जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.