
कुडाळ : शिवसेनेच्या वतीने कुडाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर बैठकीला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या गर्दीचे आणि उत्साहाचे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विशेष कौतुक केले. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी विविध चालू घडामोडींवर पक्षाची भूमिका स्पष्ट करत विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. खासदार अरविंद सावंत यांनी 'लाडकी बहीण' योजनेचा उल्लेख "मतदार खरेदी करण्याची योजना" असा केला होता, तसेच ९२ लाख महिलांना या योजनेतून वगळल्याचा आरोप केला होता. यावर प्रत्युत्तर देताना उदय सामंत म्हणाले, "त्यांचे बोलणे फारसे मनावर घेऊ नका. महाराष्ट्रात आता त्यांचे कोणीच मनावर घेत नाही, म्हणूनच आज त्यांची अशी परिस्थिती झाली आहे.
योजनेतून नाव वगळल्या गेलेल्या महिलांबाबत स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, "आम्ही राज्यातील सुमारे चार कोटी महिलांना या योजनेचा लाभ देत आहोत. मात्र, काही ठिकाणी चारचाकी वाहन असणाऱ्या किंवा शासकीय नोकरीत असणाऱ्या महिलांनी अनवधानाने फॉर्म भरले होते. छाननी दरम्यान अपात्र ठरल्यामुळे केवळ असेच फॉर्म रद्द करण्यात आले आहेत."
माजी खासदार विनायक राऊत आणि त्यांच्या मुलावर दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत विचारले असता उदय सामंत यांनी अधिक भाष्य करणे टाळले. "हा त्यांचा वैयक्तिक आणि घरातील कौटुंबिक विषय आहे, त्यामुळे त्यावर मी काही बोलणार नाही. सध्यातरी हा तपास सुरू असून हे प्रकरण न्यायालयीन कक्षेत आहे. विनायक राऊत हा काही आंतरराष्ट्रीय विषय नाही, आपण सिंधुदुर्गच्या विकासावर बोलूया," असे म्हणत त्यांनी हा विषय बाजूला सारला. आडाळी एमआयडीसीच्या प्रलंबित प्रश्नांवर बोलताना उद्योगमंत्र्यांनी सांगितले की, आमदार दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली आमच्या विभागाची एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे. यामध्ये खालील विषयांवर सकारात्मक चर्चा झाली, एमआयडीसीमधील थांबवून ठेवलेल्या प्लॉटच्या वाटपावर अंतिम निर्णय घेण्यात येईल.
स्थानिक लोकांचा ज्या 'ग्राउंड'ला विरोध होता, तो निर्णय रद्द करण्यात आला आहे. नवीन आणि स्थानिक उद्योजकांना प्राधान्याने प्लॉट उपलब्ध करून दिले जातील. सिंधुदुर्गातील नवीन एमआयडीसी संदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्यासोबत बैठक झाली असून, त्याबाबतची प्रक्रिया वेगाने सुरू आहे.
अणुऊर्जा प्रकल्पाबाबत सरकारची भूमिका मांडताना त्यांनी स्थानिक जनतेला दिलासा दिला. "लोकांवर जबरदस्तीने कोणताही प्रकल्प लादण्याचा आमचा कोणताही विचार नाही. जर हा प्रकल्प स्थानिक जनतेला मान्य असेल आणि तो त्यांच्या व क्षेत्राच्या हिताचा असेल, तरच त्यावर पुढील विचार केला जाईल. जनतेच्या इच्छेविरुद्ध कोणताही प्रकल्प रेटला जाणार नाही," असे उदय सामंत यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.










