
देवगड : देवगड तालुक्यातील मिठमुंबरी ग्रामपंचायतीच्या सभागृहात आयोजित विशेष ग्रामसभेत प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाच्या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. या ग्रामसभेला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थित नागरिकांनी प्रस्तावित प्रकल्पाबाबत आपल्या भावना, चिंता आणि भूमिका स्पष्टपणे मांडत अणुऊर्जा प्रकल्पाला एकमुखी विरोध दर्शविला. चर्चेनंतर ग्रामसभेत प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पास विरोध करणारा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. या ठरावाद्वारे गावातील शेती, बागायती, मत्स्यव्यवसाय, पर्यावरण, पर्यटन, जैवविविधता तसेच भावी पिढ्यांच्या हिताचा विचार करून मिठमुंबरी गावात अथवा परिसरात असा प्रकल्प उभारण्यात येऊ नये, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी नोंदवली.
यावेळी ग्रामस्थांनी विकासाच्या नावाखाली स्थानिकांच्या जीवनमानावर, रोजगारावर आणि नैसर्गिक संपत्तीवर परिणाम करणारे कोणतेही निर्णय स्थानिकांची संमती घेतल्याशिवाय घेऊ नयेत, अशी मागणीही केली. लोकशाही प्रक्रियेत ग्रामसभेच्या मताला प्राधान्य देण्याची अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली. ग्रामसभेत मंजूर झालेला ठराव संबंधित शासकीय विभाग, जिल्हाधिकारी तसेच राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार असून, ग्रामस्थांच्या एकमताच्या भूमिकेचा आदर करून प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाबाबत योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मिठमुंबरी ग्रामसभेने एकमताने मंजूर केलेला हा ठराव परिसरातील नागरिकांनी लोकशाही मार्गाने व्यक्त केलेल्या सामूहिक भूमिकेचे प्रतीक असल्याची भावना उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केली.










