LIVE UPDATES

भावी खासदार संदेश पारकर | जिल्‍हाभरातील 'ते' बॅनर चर्चेत

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 13, 2026 20:23 PM
views 72  views

कणकवली : क्‍वचितच असे नेते असतात जे कार्यकर्त्यांच्‍या हृदयाशी जोडले जातात. त्‍यातीलच एक नाव म्‍हणजे संदेश पारकर. गतवर्षी आई आणि वडिलांच्‍या निधनामुळे संदेश पारकरांचा वाढदिवस साजरा होऊ शकला नव्‍हता. विशेष म्‍हणजे त्‍यानंतर पारकर तब्‍बल १७ वर्षांनी कणकवलीच्‍या नगराध्‍यक्षपदी विराजमान झाले. अर्थातच यावर्षीच्‍या वाढदिसाला चार चांद लागले. याचाच परिणाम म्‍हणजे संदेश पारकरांचा यंदाचा वाढदिवस धुमधडाक्‍यात साजरा होत असून त्‍याचा प्रत्‍यय जिल्‍हाभर ठिकठिकाणी लागलेल्‍या बॅनरबाजीतून येत आहे. विशेष म्‍हणजे अनेक बॅनरवर पारकर यांचा उल्‍लेख भावी खासदार, भावी आमदार असा असल्‍याने अनेकांच्‍या भुवया उंचावल्‍या आहेत. आमदार, खासदार वगैरे उल्‍लेख असलेले हे बॅनर नेमकं काय सांगू इच्छिछतात, असा प्रश्‍‍न राजकीय वतुर्ळात उपस्थित होऊ लागला आहे. 

संदेश पारकरांचा वाढदिवस जिल्‍हावासीयांसाठी नेहमीच खास राहीला आहे. हा एकच नेता आहे, ज्‍याचा वाढदिवस एखाद्‍या इव्‍हेंटसारखा असतो. १४ जूलैला अगदी जिल्‍हाभर व खासकरून कणकवली शहरात भरगच्‍च कार्यक्रम असतात. मात्र, मागील काही वर्षांमध्‍ये कार्यक्रमांची रेलचेल थोडीशी कमी झाली होती. याला कारण होतं संदेश पारकरांचा २०१८ च्‍या नगरपंचायत निवडणुकीत झालेला पराभव. दुर्दैव म्‍हणजे गतवर्षी संदेश पारकर यांना काही दिवसांच्‍या अंतराने मातृशोक, पितृशोकाचा सामना करावा लागला. परिणामी अवघ्‍या काही दिवसांनीच असलेला त्‍यांचा वाढदिवस साजरा होऊ शकला नव्‍हता. पण, डिसेंबर महिन्‍यात पारकर कणकवलीचे नगराध्‍यक्ष बनले अन त्‍यांच्‍या कार्यकर्‍त्‍यांना पुन्‍हा एकदा हुरूप आला. त्‍याच पार्श्वभूमीवर आता संदेश पारकरांचा वाढदिवस साजरा होत आहे. 

सिंधुदुर्गातील प्रत्‍येक शहरात शुभेच्‍छांचे बॅनर लागले आहेत. कणकवली शहर तर बॅनरने फुलून गेले आहे. बॅनरवरील "जनतेच्‍या विश्‍‍वासातून उभे राहीलेले नेतृत्व", "संकटांना भेदून जनसेवेसाठी खंबीरपणे उभा राहणारा जनसेवक", "कणकवली शहराचा खरा शिलेदार", "संघर्षमय जीवनाचा, परिवर्तनवादी विचारांचा, विश्‍‍वासू लोकनेतृत्‍वाचा संदेश_ असे मजकूर आकर्षत करत आहेतच. पण, अनेक ठिकाणी भावी आमदार, भावी खासदार असे मजकूर असलेले बॅनर सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहेत. 

नगराध्‍यक्ष झाल्‍यानंतर पारकर हे अद्‍याप तरी ठाकरे शिवसेनेत असले तरी ते सत्ताधारी पक्षात प्रवेश करणार असल्‍याचीही चर्चा आहे. पारकर हे अजातशत्रू व्‍यक्तिमत्व मानले जातात. सर्वच पक्षांतील मंडळींसमवेत त्‍यांचे सलोख्‍याचे संबंध आहेत. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांना अद्‍याप तीन वर्षे आहेत. अशा वेळी पारकरांना एखाद्‍या तगड्या पक्षाने लोकसभा, अथवा विधानसभेची ऑफर दिली असावी, अशीही चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. आता यातील खरं काय अन खोटं काय, हे येणारा काळच सांगेल.