LIVE UPDATES

सासोलीतील जमीन सपाटीकरण प्रकरण

ग्रामस्थांचे प्रशासनाला सवाल | न्याय न मिळाल्यास उपोषणाचा इशारा
Edited by: कोकणसाद LIVE वृतसेवा
Published on: July 13, 2026 21:00 PM
views 98  views

दोडामार्ग : सासोली येथील कथित जमीन सपाटीकरण, वृक्षतोड व उत्खनन प्रकरणी ग्रामस्थांनी पत्रकार परिषद घेऊन प्रशासनाच्या भूमिकेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले. प्रांत कार्यालयात संबंधित सनद रद्द करण्याची सुनावणी सुरू असतानाच सपाटीकरणाची परवानगी कशाच्या आधारावर देण्यात आली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा मुंबईत बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला. तर कंपनीन थेट सनद पुरावे सादर करत सुरु असलेले काम कायदेशीर व नियमानुसार असल्याची ठाम बाजू मांडली आहे.

सासोली येथील वादग्रस्त जमीन सपाटीकरण, वृक्षतोड आणि उत्खनन प्रकरणात ग्रामस्थांनी पत्रकार परिषद घेऊन प्रशासनाच्या भूमिकेबाबत विविध प्रश्न उपस्थित केले. पत्रकार परिषदेत ग्रामस्थ मनोज गवस यांनी सांगितले की, हा विषय नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित करण्यात आला असून, यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेऊन सर्व कागदपत्रांसह वस्तुस्थिती मांडण्यात आली होती. या लढ्यात सहकार्य करणारे वकील, लोकप्रतिनिधी आणि विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले.

दरम्यान सनद प्रक्रियेबाबत आक्षेप नोंदवत श्री. गवस यांनी संबंधित जमिनीची सनद मंजूर करताना आवश्यक कागदपत्रे अपूर्ण असल्याचा दावा केला. सातबाऱ्यावरील नोंदी, भाग नकाशा आणि आकारफोड प्रक्रिया पूर्ण नसतानाही सनद मंजूर करण्यात आल्याचं त्यांचं म्हणणं आहे. ग्रामपंचायतीची चुकीची कागदपत्रे सादर करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केलाय.  प्रांत कार्यालयात सुनावणी सुरू असताना तहसीलदार  यांनी सपाटीकरणास परवानगी कशाच्या आधारे दिली, असा सवाल  उपस्थित केला. तसेच वनविभाग आणि वृक्षतोड बाबत सुद्धा अनेक सवाल उपास्थित करण्यात आले.  माजी शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांच्याभूमिकेबाबत महेश ठाकूर यांनी सवाल उपस्थित केला. 

तर महसूल विभागाने दिलेली संबंधित सनद रद्द करणे, कथित वृक्षतोड व उत्खनन तात्काळ थांबविणे, संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करणे, दोषींवर कारवाई करणे आणि जप्त यंत्रांबाबत नियमानुसार निर्णय घेण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. अन्यथा मुंबईत बेमुदत उपोषण आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

दरम्यान बाबुराव धुरी यांनीही आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितलं की, संबंधित मशीनमालक आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याचे सांगण्यात आल्याने त्याचे मशीन जप्त होऊ नये आणि त्याचा रोजगार बंद पडू नये, या हेतूनेच त्यांनी वनाधिकारी यांचेशी संपर्क साधला होता. मात्र,  कोणत्याही प्रकारे बेकायदा वृक्षतोड अथवा नियमबाह्य काम होत असेल, तर त्यालाही माझा विरोध आहे. या प्रकरणात माझा कोणताही वैयक्तिक स्वार्थ किंवा अन्य हेतू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.